गुलटेकडीला सीएनजी गॅस वाहिनी फुटली; घाबरलेले नागरिक पळाले घराबाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 03:51 PM2020-06-18T15:51:25+5:302020-06-18T15:53:14+5:30
रस्त्याची खोदाई सुरू असताना जमिनीखालून गेलेली सीएनजी गॅस वहिनी फुटली.
पुणे : ड्रेनेजलाईन टाकण्याकरिता रस्त्याची खोदाई सुरू असताना जमिनीखालून गेलेली सीएनजी गॅस वहिनी फुटली. गळती लागलेल्या वाहिनीमधून मोठ्या प्रमाणावर गॅस बाहेर फेकला जात होता. त्यावेळी शेजारच्या वस्तीमध्ये राहणाऱ्या नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. घाबरलेले नागरिक गॅस सिलेंडर घेऊन घराबाहेर पळाले. सुदैवाने कोणतीही मोठी दुर्घटना यावेळी घडली नाही. ही घटना गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास गुलटेकडी येथे घडली.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, पंडित नेहरू रस्त्यावरील गिरीधर भवन चौक ते डायस प्लॉट चौकादरम्यान ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे अनेक दिवस रखडलेले हे काम आयुक्तांच्या परवानगी नंतर सुरू करण्यात आले. डायस प्लॉट चौकात एमएनजीएलचा सीएनजी पंप आहे. याठिकाणी ही सीएनजी वाहिनी जोडण्यात आलेली आहे. मलवाहिनी टाकण्यासाठी याठिकाणी खोदाई करण्यात येत होती.
सिमेंटचा रस्ता फोडून ही खोदाई सुरू होती. ही खोदाई सुरू असताना जमिनीखालील सीएनजी गॅस वाहिनी फुटली. त्यानंतर हे काम तात्काळ थांबविण्यात आले. याची माहिती एमएनजीएल कंपनीला कळविण्यात आली. दरम्यान, प्रेशरमुळे गॅस मोठ्या प्रमाणावर बाहेर पडू लागला होता. जवळपास सात ते आठ फुटांपर्यंत हा वायू वर उडत होता. वायू गळतीमुळे आवाजही होत होता. त्यामुळे घाबरलेले नागरिक घराबाहेर पळाले. अनेकांनी तर घरातील सिलेंडर्स घेऊन पळ काढला. स्थानिक कार्यकर्त्यांनी माहिती दिल्यानंतर स्वारगेट पोलीस घटनास्थळी धावले. पोलीस बंदोबस्त लावत तात्काळ गर्दी हटविण्यात आली. पोलिसांनी नागरिकांची समजूत काढून सर्वांना घरी पाठविले.
एमएनजीएलचा आपत्कालिन विभाग, पालिकेचा आपत्कालिन विभाग, अग्निशमन दलाच्या जवानांनी एकत्रित रित्या ही गळती थांबविली.