सीएनजी दरात वाढ! पुण्यातील रिक्षाचालक गिरीश बापटांच्या कार्यालयावर काढणार मोर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2022 13:01 IST2022-08-04T13:00:57+5:302022-08-04T13:01:11+5:30
काही महिन्यांपूर्वी ६० रुपये किलो असलेला सीएनजी आज ९१ रुपये किलोपर्यंत पोहोचला

सीएनजी दरात वाढ! पुण्यातील रिक्षाचालक गिरीश बापटांच्या कार्यालयावर काढणार मोर्चा
पुणे : सीएनजी दरात होणारी वाढ आणि त्यामुळे रिक्षाचालकांच्या वाढणाऱ्या अडचणी या पार्श्वभूमीवर रिक्षा पंचायतीने नऊ ऑगस्टला खासदार गिरीश बापट यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचे ठरवले आहे. काही महिन्यांपूर्वी ६० रुपये किलो असलेला सीएनजी आज ९१ रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. या दरवाढीस नरेंद्र मोदी नेतृत्व करत असलेले केंद्र सरकार जबाबदार असून सीएनजीच्या दरात सतत होणाऱ्या या दरवाढीचा रिक्षा पंचायत पुणे, पिंपरी-चिंचवडतर्फे निषेध केला जात आहे. मोर्च्याच्या काळात सकाळी साडेदहा ते दुपारी एक वाजेपर्यंत रिक्षा बंद ठेवून मोर्चामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन रिक्षा पंचायतीने रिक्षाचालकांना केले आहे.
पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांतील प्रदूषण कमी करण्यासाठी २००९ साली सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनंतर रिक्षाला सीएनजीची सक्ती केली. त्यास विरोध न करता रिक्षा पंचायतीने व तिच्या सभासद रिक्षा चालकांनी सीएनजीचे पंप तुरळक असताना रोज ५ ते ६ तास रांगेत थांबून सीएनजीची व्यवस्था नियमित होण्यात सक्रिय सहभाग दिला. आता कुठे सीएनजी फारसा रांगेत न थांबता मिळू लागला असताना सीएनजीचा किलो मागील दर प्रचंड प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे रिक्षाचालकांचा असंतोष खासदार बापट त्यांच्यामार्फत केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी क्रांतिदिनी म्हणजेच ९ ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहा वाजता हुतात्मा स्मारक बुधवार पेठ, मजूर अड्डा येथून महागाईविरोधी मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर जाईल. त्याआधी कसबा पेठेतील गिरीश बापट यांच्या कार्यालयावर मोर्चा नेऊन सीएनजी दरवाढीचा तीव्र निषेध करण्यात येणार असल्याची माहिती रिक्षा पंचायतीच्या वतीने देण्यात आली.
रिक्षा चालकांच्या मागण्या
१) सीएनजीचा दर नियंत्रित करा.
२) सीएनजीवरील उत्पादन कर कमी करा.
३) पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी २००९ साली सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार रिक्षाला सीएनजीची सक्ती केली. अशी सक्ती पण करायची आणि किंमत पण वाढवायची, हा अन्याय आहे. त्यामुळे सीएनजीवर अनुदान मिळाले पाहिजे.
४) देशात उत्पादित होणऱ्या सीएनजीचा दर आंतरराष्ट्रीय बाजारातील दराप्रमाणे ठरवणे बंद करा.