ग्रीन पुण्यासाठी सीएनजी जनजागृती दौड
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2017 06:09 PM2017-11-19T18:09:54+5:302017-11-19T18:10:20+5:30
दिवसागणिक पुण्यामध्ये वाढणारी दुचाकींची संख्या आणि त्यासोबतच वाढणारे प्रदूषण यामुळे पुणेकरांचे आरोग्य धोक्यात येत आहे.
पुणे - दिवसागणिक पुण्यामध्ये वाढणारी दुचाकींची संख्या आणि त्यासोबतच वाढणारे प्रदूषण यामुळे पुणेकरांचे आरोग्य धोक्यात येत आहे. दिल्लीमध्ये प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडली असून तशीच वेळ पुण्यावर येऊ नये याकरीता पुण्यातील दुचाकीस्वारांनी सीएनजी कीट बसवून प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी योगदान द्यावे, यासाठी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडतर्फे जनजागृती अभियान राबविण्यात आले. तब्बल १० किलोमीटर धावून ग्रीन सिटी चा संदेश यावेळी देण्यात आला.
म्हाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलापासून पुणे रनिंग बियाँड मायसेल्फ मॅरेथॉनमध्ये सीएनजी जनजागृती अभियानाला सुरुवात झाली. यावेळी महाराष्ट्र नॅचरल गॅसचे व्यवस्थापकीय संचालक अरविंद तांबेकर, वाणिज्यिक संचालक संतोष सोनटक्के, आॅपरेशन आणि देखभाल विभागाचे मुख्य महाव्यवस्थापक मिलिंद नरहर शेट्टीवार, मिलिंद ढकुले आदी मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्र नॅचरल गॅसचे ६० कर्मचारी अभियानात सहभागी झाले. यावेळी सीएनजी कीट बसविलेल्या दुचाकीची टेस्ट ड्राईव्ह देखील पुणेकरांनी घेतली.
संतोष सोनटक्के म्हणाले, पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या किमतीत होणारी वाढ याला सीएनजी (कम्प्रेस्ड नॅचरल गॅस) आणि पीएनजी (पाईप्ड नॅचरल गॅस) हा अत्यंत स्वस्त आणि पर्यावरणपूरक पर्याय आहे. केवळ दुचाकीच नाही तर चारचाकी वाहने, बसेस यामध्ये देखील सीएनजीचा वापर करता येतो. दुचाकींना सीएनजी कीट बसविण्याकरीता ८५ टक्के वित्तपुरवठा देखील करण्यात येत आहे़