पुण्यात पीएमपीएमएल बसेसचा सीएनजी पुरवठा आज मध्यरात्रीपासून बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2019 01:34 PM2019-05-24T13:34:59+5:302019-05-24T13:40:01+5:30
गेल्या अनेक दिवसापासून पीएमपीएमएल प्रशासनाकडून गॅस पुरवठ्याची रक्कम वेळेवर दिली जात नसल्याने आजमितीस सुमारे रुपये ४७.२२ कोटी थकबाकी शिल्लक आहे.
पुणे : पुण्याच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची कणा असलेल्या पीएमपीएल ला महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी) चा पुरवठा आज मध्यरात्रीपासून (दि.२४ मे) बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जीवनवाहिनी असणाऱ्या पीएमपीच्या ताफ्यातील सीएनजीवर चालणा-या १ हजार २३५ बसेस बंद पडणार आहेत. मागील २ वर्षांपासून असलेली थकबाकी आजमितीस रुपये ४७.२२ कोटीपर्यंत पोहोचली आहे.
एमएनजीएलकडून वेळोवेळी पत्रव्यवहार केला असूनही थकबाकी कमी करण्याबाबत पीएमपीएमएल कडून कोणतीही कार्यवाही केली जात नसल्याने हा निर्णय घेण्यात येत असल्याची माहिती महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडचे वाणिज्यिक संचालक संतोष सोनटक्के यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेला एमएनजीएलचे व्यवस्थापकीय संचालक सुप्रियो हलदर, सरव्यवस्थापक सुजित रुईकर, मुख्य वाणिज्यिक अधिकारी एस.चंद्रमोहन, मुख्य व्यवस्थापक (वाणिज्य) मयुरेश गानू, सरव्यवस्थापक (मार्केटिंग) मिलिंद ढकोले आदी उपस्थित होते.
सुप्रियो हलदर म्हणाले, महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड हा गेल इंडिया लिमिटेड व भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन यांचा संयुक्त उपक्रम आहे. या कंपनी मध्ये महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र औद्योगिक महामंडळातर्फे भाग भांडवल गुंतवलेले आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसेसना सीएनजीचा पुरवठा एमएनजीएल मार्फत केला जातो. गेल्या अनेक दिवसापासून पीएमपीएमएल प्रशासनाकडून गॅस पुरवठ्याची रक्कम वेळेवर दिली जात नसल्याने आजमितीस सुमारे रुपये ४७.२२ कोटी थकबाकी शिल्लक आहे.
संतोष सोनटक्के म्हणाले, एमएनजीएलतर्फे वारंवार शासनाच्या सर्व स्तरांवर पत्रव्यवहार, प्रत्यक्ष भेटून याबाबत पाठपुरावा करण्यात आला. मात्र, त्याबाबत कोणताही समाधानकारक प्रतिसाद किंवा कार्यवाही झाली नाही. त्याबाबत पीएमपीएमएल कडून प्रत्येकवेळी पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत मिळणाºया अनुदानाची थकबाकी असल्याचे कारण सांगण्यात येते. त्यामुळे पीएमपीएमएल कडून एमएनजीएलला मिळणारी रक्कम म्हणजेच थकबाकी दिवसेंदिवस वाढत आहे. पयार्याने एमएनजीएलची इतरांची व बँकेची देणी वाढत आहेत. त्यामुळे पीएमपीएमएलला सीएनजीचा पुरवठा बंद करण्यात येत आहे. जोपर्यंत संपूर्ण थकबाकी मिळणार नाही, तोपर्यंत हा पुरवठा सुरु करण्यात येणार नाही, असेही त्यांनी सांगिताले.
...
पीएमपी दररोज सुमारे ६० हजार किलो पुरवठा होतो. दररोज त्याचे ३० लाख बिल होते. दर महिना १० कोटी रुपये होतात. त्यापैकी कमी रक्कम दरमहा दिली जाते.