मिळकतकर भरण्यासाठी कर्ज देण्याचा सहकारी बँकाचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:14 AM2020-12-30T04:14:16+5:302020-12-30T04:14:16+5:30
पुणे : कोरोना आपत्तीमुळे आर्थिक संकंटात सापडलेल्यांना, अभय योजनेतंर्गत दिलेल्या सवलतीचा लाभ घेऊन मिळकतकराचा भरणा करणे शक्य होत नाही़ ...
पुणे : कोरोना आपत्तीमुळे आर्थिक संकंटात सापडलेल्यांना, अभय योजनेतंर्गत दिलेल्या सवलतीचा लाभ घेऊन मिळकतकराचा भरणा करणे शक्य होत नाही़ या पार्श्वभूमीवर महापालिकेने शहरातील सर्व बँकांना मिळकतकर भरणाकरण्याकरिता कर्ज उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव दिला असून, यास तीन सहकारी बँकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे़
पुणे महापालिकेचे कर आकारणी व कर संकलन प्रमुख विलास कानडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अभय योजनेंतर्गत २६ जानेवारीपर्यंत मिळकतकर भरण्यासाठी नागरिकांना कर्ज उपलब्ध व्हावे़ याकरिता शहरातील सर्व सरकारी, सहकारी बँकांसह पतसंस्थांनाही महापालिकेने प्रस्ताव दिला आहे़
पुणे महापालिकेने नुकतेच शहरातील बँकांना प्रत्यक्ष चर्चेस बोलावून, मिळकतकरासाठी कर्ज उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव दिला़ त्यानुसार आतापर्यंत सुवर्णयुग सहकारी बँक, सारस्वत सहकारी बँक, जनता सहकारी बँक यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे़ त्यामुळे ज्या थकबाकीदारांना मिळकतकर भरण्यासाठी कर्जाची आवश्यकता आहे, त्यांनी संबंधित बँकांकडे संपर्क साधावा़ त्यांना बँकेच्या नियमानुसार कर्ज पुरवठा केला जाईल. दरम्यान या तीन सहकारी बँकाप्रमाणेच शहरातील इतर सर्वच बँकांनी सदर कामी पुढाकार घेऊन, पुणे शहराच्या विकासास सहकार्य करावे असे आवाहन पुणे महापालिकेने केले आहे़