सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया होणार ऑनलाइन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2020 03:52 AM2020-02-20T03:52:02+5:302020-02-20T03:52:20+5:30
संकेतस्थळ निर्मितीला मान्यता : संपूर्ण निवडणूक आॅनलाईन होण्यासाठी पहिले पाऊल
पुणे : सहकार निवडणूक प्राधिकरणामार्फत घेण्यात येणाऱ्या सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया आॅनलाइन होणार आहे. राज्य सरकारने प्राधिकरणाचे संकेतस्थळ तयार करण्यासाठी निधीची तरतूद केली असून, महाआयटी कॉर्पोरेशनच्या माध्यमातून येत्या सहा महिन्यात संकेतस्थळ कार्यान्वित करण्यात येणार आहे, अशी माहिती प्राधिकरणातील अधिकाऱ्यांनी दिली.
राज्यामधे २ लाखांहून अधिक सहकारी संस्था आहेत. सहकारी गृहसंस्था, सहकारी साखर कारखाने, नागरी सहकारी बँका, सूत गिरण्या, दूध उत्पादक संघ, कृषी उत्पन्न बाजार समिती अशा विविध सहकारी संस्थांचा यात समावेश आहे. दर पाच वर्षांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर करणे, आरक्षण करणे, मतदार याद्या प्रसिद्ध करणे, नामनिर्देशनपत्र घेणे आणि संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याची जबाबदारी प्राधिकरण सहकार विभागाच्या माध्यमातून केली जाते. अनेकदा संबंधित संस्थेच्या सभासदांना निवडणूक प्रक्रियेची माहितीच उपलब्ध होत नाही. या संकेतस्थळामुळे निवडणुकीची सर्व माहिती जनतेसाठी उपलब्ध होईल. सहकारी संस्थांच्या नविडणुका आॅनलाईन घेण्यासाठी प्राधिकरणाचे संकेतस्थळ असणे गरजेचे आहे. त्यासाठी प्राधिकरणाने राज्य सरकारला प्रस्ताव पाठविला होता. त्यास मंजुरी मिळाली असून, ८ लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. सहकार कायदा तरतुदी, सहकारी संस्थांची अ, ब, क आणि ड या श्रेणी नुसार विभागणी, नामनिर्देशन पत्र कसे असते, निवडणूक प्रक्रिया काय आहे याची माहिती यात येईल.
हळूहळू बदल होणार
सुरुवातीस अ श्रेणीतील म्हणजेच साखर कारखाने, बँका यांच्या निवडणुका आॅनलाइन घेतल्या जातील. त्यांचे नामनिर्देशनपत्र देखील आॅनलाईन घेण्यात येईल. टप्प्याटप्प्याने सर्व संस्थांच्या निवडणुका आॅनलाइन घेतल्या जातील. हे सर्व बदल एकदम होणार नाहीत. हळूहळू संकेतस्थळात असे बदल करुन निवडणूक आॅनलाइन करण्याच्या दिशेने वाटचाल करण्यात येणार असल्याचे अधिकाºयांनी स्पष्ट केले.