केंद्र सरकारच्या धोरणांमुळे सहकारी संस्था अडचणीत येणार : दिलीप वळसे पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2022 04:50 PM2022-09-06T16:50:27+5:302022-09-06T16:55:02+5:30
घोडेगाव : केंद्र सरकारच्या धोरणांमुळे पुढील काळात सहकारावर मोठा परिणाम होणार आहे. यात छोट्या बॅंका, सहकारी संस्था टिकवणे हे ...
घोडेगाव : केंद्र सरकारच्या धोरणांमुळे पुढील काळात सहकारावर मोठा परिणाम होणार आहे. यात छोट्या बॅंका, सहकारी संस्था टिकवणे हे मोठे आवाहन राहणार आहे. त्यामुळे आपल्या वडीलधाऱ्या जुन्या लोकांनी १०० वर्षांपासून जोपासलेल्या व शेतकऱ्यांना अडीनडीला उपयोगात आलेल्या संस्था अडचणीत येणार आहेत, असे मत राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले.
घोडेगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेला १०० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी संस्थेच्या ज्येष्ठ सभासदांचा सत्कार वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी संस्थेचे चेअरमन सुरेशशेठ काळे, शारदा प्रबोधिनीचे ह.भ.प.पांडुरंग महाराज येवले, माजी सभापती कैलासबुवा काळे, सखाराम घोडेकर, सखाराम पाटील काळे, वसंतभाऊ काळे, किरण घोडेकर, एकनाथ घोडेकर, अक्षय काळे, क्रांती गाढवे, मंजुषा बोऱ्हाडे, रूपाली झोडगे, सुदाम काळे, सोमनाथ काळे, तुकाराम काळे, विनोद कासार, दिनेश घुले, मार्तंड काळे इत्यादी उपस्थित होते.
यावेळी बोलताना वळसे पाटील म्हणाले, स्वातंत्रयाच्या पूर्वी २०२१ सालामध्ये ही सोसायटी स्थापन झाली आहे. ब्रिटिश राजवट असताना आपल्या जुन्या मंडळींनी विचार करून सोसायट्या, ग्रामपंचायती स्थापन केल्या व शंभर वर्ष संभाळल्या. शेतकऱ्यांचे भले करण्यासाठी समाजात एकोपा ठेवून या संस्था उभ्या केल्या. आजही वर्षा अखेरीस मिळणाऱ्या लाभांशचा आनंद शेतकऱ्यांना मोठा असतो. १९४७ पूर्वीच्या जुन्या लोकांकडून या जडणघडणी समजून घेणे महत्त्वाचे आहे. मात्र केंद्र सरकारने सहकार क्षेत्रातील माॅडेल बाय लाॅज प्रसिद्ध केले आहे. यावर मते मागवली आहेत. याचा परिणाम सहकार क्षेत्रावर मोठा होणार आहे.