सहकारी कारखाने खासगी कारखानदारांनी लाटले - पालकमंत्री गिरीश बापट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2018 12:36 AM2018-11-04T00:36:26+5:302018-11-04T00:36:47+5:30
‘‘सहकारी साखर कारखाने बंद पाडायचे. त्यानंतर २०० ते ४०० कोटी रुपयांनी कारखाने लिलाव मॅनेज करून अवघ्या पंधरा वीस कोटीत विकत घ्यायचे धंदे खासगी कारखानदारांनी केले आहेत. हे पाप कधीतरी उघडकीस आल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका पालकमंत्री गिरीश बापट यांनी केली.
बारामती - ‘‘सहकारी साखर कारखाने बंद पाडायचे. त्यानंतर २०० ते ४०० कोटी रुपयांनी कारखाने लिलाव मॅनेज करून अवघ्या पंधरा वीस कोटीत विकत घ्यायचे धंदे खासगी कारखानदारांनी केले आहेत. हे पाप कधीतरी उघडकीस आल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका पालकमंत्री गिरीश बापट यांनी केली.
माळेगाव कारखान्याचा ६२ वा गळीत हंगाम शुभारंभ पालकमंत्री बापट यांच्यासह अन्य मंत्र्यांच्या हस्ते पार पडला. यावेळी आयोजित सभेत ते बोलत होते. बापट म्हणाले, कारखाना चालू नये, म्हणून ऊस दुसरीकडे जाऊ नये, यासाठी पोलीसबळाचा वापर केला जातो. खासगी कारखाने जोरात, सहकारी कारखानदारी मात्र तोट्यात आहेत. शेतकऱ्याला मदत करण्याऐवजी त्याच्या पायात खोडा घालण्याचे पाप या ठिकाणी सुरू आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. पैसे देऊन माणसे आणून विरोधक मोर्चे काढत असल्याची टीका बापट यांनी केली. पणनमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, की सहकार चळवळ मोडीत निघाल्याची टीका होत आहे. वास्तविक आमचा कोणाचा साखर कारखाना नाही. उलट साखर कारखाने बंद पाडून खरेदी कोणी केले त्याची यादी जाहीर करा, मग सहकार कोणी मोडीत काढला हे आपोआप समजेल.
खासदार अमर साबळे म्हणाले, नरेंद्र मोदी यांनी ‘न खाऊंगा, न खाने ुदुंगा’ असे धोरण राबवत अनुदान थेट लाभार्थी, शेतकरी यांच्या खात्यावर जमा करण्यास सुरुवात केली. त्यामुळे दलालांचे प्रतिनिधी असणाºयांचे गल्ले बंद झाले. गल्ला बंद झाल्याने अस्वस्थ झालेल्या प्रतिनिधींनी हल्लाबोल करीत असल्याची टीका खासदार साबळे यांनी केली. प्रास्ताविकात कारखान्याचे अध्यक्ष रंजनकुमार तावरे म्हणाले, की माळेगाव कारखान्याचे यंदा १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट आहे. मुख्यमंत्र्यांसह सहकारमंत्र्यांनी मदत केल्याने कारखान्याच्या विस्तारीकरण प्रकल्पाला मंजुरी मिळाली. येत्या काही दिवसांत साडेसात हजार टनापेक्षा अधिक गाळप सुरू होईल. यंदा १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट आहे. संगणकीकरणाद्वारे कमी मनुष्यबळावर कारखाना चालवून शेतकºयांना अधिकचे पैसे देण्याचा प्रयत्न आहे. ज्येष्ठ संचालक चंद्रराव तावरे म्हणाले, की १९५० च्या दशकात गुळाला भाव नव्हता. शेती परवडत नव्हती. ऊस पिकविणारा वर्ग हवालदिल झाला होता. त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री कै. यशवंतराव चव्हाण यांच्यसह अन्य नेत्यांनी ऊस उत्पादकांसाठी धाडसी निर्णय घेतला. सभासदांना साखर कारखान्याचे मालक बनविण्यासाठी धोरण राबविले. मात्र, त्यामध्ये २५ ते ३० वर्षांनंतर राजकारण आले. शेतकरी त्यानंतर अडचणीत आले. दागिने गहाण ठेवून, जनावरे विकून शेतकºयांनी शेअर्स गोळा करून उभारलेले कारखाने फुकटात, नाममात्र दरात घेण्याचे काम सुरू झाले. खासगी कारखानदार सहकाराच्या तुलनेने कमी दर देऊन प्रचंड नफा मिळवत आहेत. त्यामुळे राजा व्यापारी झाल्यानंतर प्रजा भिकारी होते, अशी टीका ज्येष्ठ नेते तावरे यांनी केली.
प्रा. अनिल धुमाळ यांनी सूत्रसंचालन केले. शशिकांत कोकरे यांनी आभार मानले. यावेळी भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे, दिलीप खैरे, पृथ्वीराज जाचक, संपतराव देवकाते, प्रशांत सातव, बापूराव सोलनकर, तानाजी थोरात, विष्णु चव्हाण आदी उपस्थित होते.
...तर मुकासुद्धा बोलायला लागेल
माझा बोलून बोलून घसा बसलाय त्यामुळे बोलताना त्रास होतोय. मात्र, बारामतीत आल्यावर बोंब मारल्याशिवाय जाता येत नाही. मुक्या माणसाला आणून बारामतीचा ५० वर्षांचा इतिहास सांगितल्यावर तो पण बोलायला लागेल. त्या इतिहासावर मात करून रंजन तावरे, चंद्रराव तावरे करीत आहेत, अशी टीका पालकमंत्री गिरीश बापट यांनी केली.
...जानकर यांच्या अक्कलदाढेची गरज
महादेव जानकर यांच्यावर दाढदुखीसाठी उपचार सुरू आहेत. त्यांना मला ती दाढ आणून द्या, असे सांगितले आहे. बारामतीत बसली तर बसवतो. त्याला अक्कलदाढ म्हणतात. बारामतीत त्याला ‘डिमांड’ आहे. खरे तर जानकर यांची अक्कलदाढ बारामतीत बसविण्याची गरज आहे. त्यामुळे जानकर यांनी त्यांची अक्कलदाढ इथे देता आल्यास जरुर द्यावी. त्यामुळे एखाद्याचे कल्याण होईल, असा टोला पालकमंत्री गिरीश बापट यांनी लगावला.
...जाचक यांना तिकडच्या आळीला जाऊ देणार नाही
पृथ्वीराज जाचक माझी विनंती आहे. पालकमंत्री गिरीश बापट आणि आम्ही तुम्हाला तिकडच्या आळीला जाऊ देणार नाही. काही चुका झाल्या असतील. सरकार आपले असून आपल्या माणसावर अन्याय होणार असेल. आपण यावर चिंतन करणे आवश्यक आहे, असे सांगून दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी जाचक यांच्या राजकीय प्रवेशाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यामुळे जाचक तिकडच्या म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत का? अशी चर्चा सभेदरम्यान रंगली.
...आता हजारो उठतील
अजित पवार यांच्या नुकत्याच पार पडलेल्या दुष्काळी पाहणी दौºयात एका सभेत माजी सैनिकाने पवार यांंना पेट्रोल पंप मिळण्यासाठी मदत न केल्याची तक्रार केली होती. ही घटना चर्चेचा विषय ठरली. याबाबत माहिती मिळालेल्या बापट यांनी तो धागा पकडत बारामतीत अनेक सभा होतात. माजी सैनिक उभा राहून अन्यायाविरोधात बोलतो. आता हजारो उठतील,
त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचा पाढा वाचल्याशिवाय राहणार नाही, असा टोला पालकमंत्री गिरीश बापट यांनी लगावला.