संघाच्या शाखेत वादातून प्रशिक्षकाला दंड आणि चामडी पट्ट्याने मारहाण, माजी स्वयंसेवकाचे कृत्य
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2022 08:49 PM2022-06-09T20:49:14+5:302022-06-09T20:49:49+5:30
RSS News: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वार्षिक उत्सवामध्ये झालेल्या शाब्दीक वादाच्या रागातून संघ शाखेत येणाऱ्या माजी स्वयंसेवकांनी शाखा प्रशिक्षकाचा लाकडी दंड घेऊन त्यांना दंड आणि चामडी पट्टयाने बेदम मारहाण करण्याचा प्रकार समोर आला आहे.
पुणे :- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वार्षिक उत्सवामध्ये झालेल्या शाब्दीक वादाच्या रागातून संघ शाखेत येणाऱ्या माजी स्वयंसेवकांनी शाखा प्रशिक्षकाचा लाकडी दंड घेऊन त्यांना दंड आणि चामडी पट्टयाने बेदम मारहाण करण्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी हर्षवर्धन सुनिल हरपुडे (वय २१, रा. तावरे कॉलनी, सहकारनगर) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी कुंदन सोनावणे, रुपेश खाडे, अमन शेख, हेमंत जाधव यांच्यासह चार ते पाच अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार सहकारनगरमधील अध्यापक कॉलनीतील मैदानावर मंगळवारी रात्री साडेआठ वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हर्षवर्धन हरपुडे हे विधी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाचे शिक्षण घेत आहेत. ते लहानपणापासून संघ स्वयंसेवक असून अनेक वर्षांपासून अध्यापक कॉलनीतील मैदानावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत लहान मुलांना प्रशिक्षण देण्याकरीता जातात. टांगेवाला कॉलनी येथे राहणारे हेमंत जाधव, कुंदन सोनावणे, अमन शेख व इतर हेही शाखेमध्ये येत होते. ४ ते ५ वर्षांपूर्वी शाखेच्या वार्षिक उत्सवामध्ये त्यांच्यामध्ये शाब्दिक वाद झाल्यानंतर त्यांनी शाखेत येण्याचे बंद केले.
मंगळवारी नेहमीप्रमाणे हरपुडे शाखेत गेले होते. शाखा संपल्यावर ते बाजूच्या कट्यावर बसले असताना काही लहान मुले अमित हिरणवाळे याला हाताने मारहाण करु लागले. तेव्हा हरपुडे याने मध्यस्थी करुन त्यांना समजावून सांगून लागले. ही भांडणे पाहून हेमंत जाधव, कुंदन सोनावणे व इतर तेथे आले. कुंदन याने कमरेच्या चामडी पट्टयाने, रुपेश खाडे याने ग्राऊंडवर पडलेल्या झाड्याच्या फांदीने फिर्यादी यांना बेदम मारहाण केली. कट्ट्यावर ठेवलेला लाकडी दंड फिर्यादीच्या पाठीत जोरात मारला. सहायक पोलीस निरीक्षक बेरड तपास करीत आहेत