‘जीएसटी’ने कोचिंग महागणार
By admin | Published: June 27, 2017 08:01 AM2017-06-27T08:01:59+5:302017-06-27T08:01:59+5:30
दिवसेंदिवस खासगी शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेणे महाग होत असताना आता त्यात वस्तू व सेवा कर (जीएसटी) प्रणालीची भर पडणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : दिवसेंदिवस खासगी शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेणे महाग होत असताना आता त्यात वस्तू व सेवा कर (जीएसटी) प्रणालीची भर पडणार आहे. कोचिंग क्लासेसवर पूर्वी असलेल्या १५ टक्के सेवा करात जीएसटीमध्ये तीन टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे या क्लासेसमध्ये प्रवेश घेणे महागणार असून क्लासेसकडून विद्यार्थ्यांना दि. ३० जूनपर्यंत प्रवेश घेण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. तसेच दि. १ जुलैनंतर प्रवेश घेतल्यास वाढीव शुल्क भरावे लागणार असल्याचेही त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
देशभरात येत्या एक जुलैपासून वस्तू व सेवा कर (जीएसटी) ही करप्रणाली लागू होणार आहे. या नव्या जीएसटी तरतुदीचा सर्वाधिक फटका विद्यार्थी व पालकांना बसणार आहे. शिक्षणक्षेत्रात वाढत चाललेल्या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांचा ओढा खासगी कोचिंग क्लासेसकडे वाढला आहे. विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा, त्यात सातत्याने होणारे बदल, महाविद्यालय स्तरावर योग्य मार्गदर्शन न मिळणे, विविध प्रवेश परीक्षांच्या अभ्यासक्रमातील तफावत, तसेच प्रवेशासाठी वाढलेल्या स्पर्धेमुळे कोचिंग क्लासेसचे पेव वाढत चालले आहे. मागील काही वर्षांपासून या क्लासेसमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही झपाट्याने वाढत चालली आहे. या क्लासेसची महाविद्यालयांना समांतर यंत्रणा उभी राहू लागली आहे. त्यातच वाढत्या शुल्कामुळे विद्यार्थी व पालक बेजार झालेले आहेत. आता त्यात पुन्हा जीएसटीची भर पडली आहे.