कोळविहिरे-नीरा गटात बंडखोरी; राष्ट्रवादी अडचणीत
By Admin | Published: February 17, 2017 04:22 AM2017-02-17T04:22:09+5:302017-02-17T04:22:09+5:30
पुरंदर तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक येत्या २१ फेब्रुवारी रोजी होत असून, कोळविहिरे-नीरा गटात
जेजुरी : पुरंदर तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक येत्या २१ फेब्रुवारी रोजी होत असून, कोळविहिरे-नीरा गटात राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या सुजाता दगडे आणि कोळविहिरे गणात सुरेश जगताप यांनी बंडखोरी केल्याने राष्ट्रवादीची अडचण होणार, अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.
या गटातून कॉँग्रेसच्या सुप्रिया सचिन दुगार्डे-नवले, राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या तेजश्री विराज काकडे, तसेच भाजपाकडून सम्राज्ञी सचिन लंबाते तर सेनेच्या शालिनी शिवाजी पवार अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवीत आहेत. सहा महिन्यांपूर्वी ही निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून मनसेतून राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या सुजाता वसंत दगडे यांनी बंडखोरी केली आहे. त्याचबरोबर अर्जमाघारीसाठी वेळेत न पोहोचल्याने अपक्ष उमेदवारी राहिलेल्या तेजस्वी गणेश गडदरे निवडणूक लढवीत आहेत. जिल्हा परिषदेसाठी आता बहुरंगी निवडणूक होत आहे. याशिवाय, कोळविहिरे गणातून काँग्रेसचे महेश खैरे, राष्ट्रवादीचे सर्जेराव ऊर्फ बापू भोर, भाजपाचे अॅड. दशरथ घोरपडे, सेनेचे अतुल म्हस्के यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर उमेद्वार सुरेश जगताप हे अपक्ष निवडणूक लढवीत आहेत. याशिवाय, भारतीय शेतकरी कामगार पक्षाकडून अक्षय चाचर आणि अपक्ष म्हणून ज्ञानेश्वर कदम हे निवडणुकीत उतरले आहेत. तिकडे नीरा गणातही काँगे्रसचे विजय भालेराव, राष्ट्रवादीचे देविदास भोसले, भाजपाचे सतीश गालिंदे, सेनेचे गोरखनाथ माने, आरपीआय अनिल बाळू मसणे आणि अपक्ष प्रकाश जगदाळे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
गटात व दोन्ही गणांत बहुरंगी लढतीचे चित्र आहे. यात गटातून सुजाता दगडे आणि कोळविहिरे गणातून सुरेश जगताप यांची बंडखोरी संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय बनला आहे. या दोघांची
बंडखोरी राष्ट्रवादी काँग्रेसला अडचणीची ठरणार असल्याची चर्चा संपूर्ण गटात होत आहे. राष्ट्रवादीच्या तेजश्री काकडे या गटातील सर्वांत जास्त मतदारसंख्या असलेल्या नीरा या गावातील आहेत. तेथीलच सुजाता दगडे याही असल्याने या दोघींत गावापासूनच चुरस रंगणार आहे. यातच नीरा येथील चव्हाण गट आणि काकडे गट यांच्यात टोकाचे मतभेद असल्याने चव्हाण गट निवडणुकीत नेमकी कोणती भूमिका घेणार, यावर नीरा येथील मताधिक्य अवलंबून राहील.
नीरेतीलच मताधिक्यावर निवडणुकीचा आजपर्यंत निकाल लागलेला असल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. काकडे या विद्यमान जिल्हा परिषदेचे सदस्य विराज काकडे यांच्या पत्नी असून, विराज काकडे यांनी गटात केलेल्या विकासकामांचा त्यांना फायदा होईल हे जेवढे खरे, तेवढेच सुजाता दगडे याही पुरंदर पंचायत समितीच्या नीरा गणातून निवडून आलेल्या आहेत. पहिली अडीच वर्षे त्या सभापती होत्या. सध्या त्या सदस्य आहेत. त्यांचाही लोकसंपर्क मोठा असून पूर्वाश्रमीच्या मनसेत असल्याने त्यांना या निवडणुकीत मनसेचीही रसद मिळण्याची शक्यता अधिक आहे. यामुळे राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या काकडे यांच्या अडचणी वाढलेल्या आहेत. या गटातून प्रथमच सर्वच पक्षांचे उमेद्वार निवडणुकीच्या रिंगणात असल्याने निवडणूक रंगतदार बनली आहे. याच गटातील कोळविहिरे
गणातही राष्ट्रवादी कँग्रेसचे सुरेश जगताप यांनी बंडखोरी केल्याने मोठी चुरस निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या विद्यमान सभापती अंजना भोर यांचे पती बापू भोर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. येथेही काँगे्रस, सेना, भाजपा, शेकाप आणि एक अपक्ष अशीच बहुरंगी निवडणूक होत आहे. या गणात जेजुरी औद्योगिक क्षेत्र विस्तारीकरणाचा प्रश्न चांगलाच गाजतो आहे. गेल्या सहा-सात वर्षांपासून येथील शेतकऱ्यांच्या बागायती जमिनी वगळण्याची मागणी आहे. मात्र, सर्वच राजकीय पक्षांनी येथील शेतकऱ्यांना केवळ आश्वासनेच दिलेली आहेत. यामुळे येथील मावडी क.प., कोळविहिरे आणि नावळी येथे मोठी नाराजी आहे. विशेष म्हणजे, या तिन्ही गावांतून उमेदवार रिंगणात आहेत.