नायजेरीयन नागरिकाकडून तब्बल दोन काेटींचे काेकेन जप्त; आठ वर्षांपासून पुण्यात करतोय तस्करी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2022 06:36 PM2022-12-09T18:36:19+5:302022-12-09T18:36:38+5:30
सर्वप्रथम २०१४ मध्ये काेकेन तस्करीप्रकरणी कस्टम विभागाने त्याला अटक केली आणि गुन्हा दाखल केला
पुणे : काेकेन या अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या नायजेरियन नागरिकास पुणे शहर पाेलिसांच्या अमली पदार्थ विराेधी पथकाने उंड्री भागातून ताब्यात घेतले. त्याच्याकडून १ किलाे ८१ ग्रॅम काेकेनसह २ काेटी २० लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. फाॅलरिन अब्दुल अजीज अंडाेई ( वय ५०,रा. शकुंतला कानडे पार्क, उंड्री, मूळ नायजेरिया) अशी अटक केलेल्या आराेपीचे नाव आहे. त्याच्याविराेधात काेंढवा पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे शहर पाेलिसांच्या रेकाॅर्डवरील नायजेरियन व्यक्ती अमली पदार्थाची तस्करी करीत असल्याची माहिती अमली पदार्थ विराेधी पथक एक मधील कर्मचाऱ्यास मिळाली हाेती. त्यानुसार पथकाने उंड्री परिसरात त्याचा शाेध सुरू केला. दरम्यान मंतरवाडीच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर आर पाॅईन्ट साेसायटी समाेरून फाॅलरीन याला ताब्यात घेतले. फाॅलरिन कडून काेकेन, इलेक्ट्राॅनिक काटे, कार, सहा माेबाईल असा एकुण २ काेटी २० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पथकाचे वरिष्ठ पाेलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, शैलजा जानकर, प्रविण उत्तेकर, पांडुरंग पवार, मनाेजकुमार साळुंखे, विशाल दळवी, संदिप शिर्के, सुजित वाडेकर, राहुल जाेशी, विशाल शिंदे, रेहाना शेख यांनी ही कारवाई केली.
फाॅलरिन हा रेकाॅर्डवरील गुन्हेगार आहे. यापूर्वी २०१९ मध्ये चतु:श्रृंगी पाेलीस ठाणे हद्दीत काेकेन विक्री केल्याप्रकरणी त्याला पुणे शहर पाेलिसांनी अटक केली हाेती. त्यावेळी त्याच्याकडे ४५० ग्रॅम काेकेन सापडले हाेते. न्यायालयाने त्याची रवानगी येरवडा कारागृहात केली हाेती. जानेवारी २०२२ मध्ये ताे जामिनावर बाहेर पडला हाेता. तसेच तत्पूर्वी त्याच्यावर कस्टम विभागाने २०१४ मध्ये कारवाई केली हाेती अशी माहिती वरिष्ठ पाेलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिली.
बावीस वर्षापासून भारतात वास्तव्य
फाॅलरीन अंडाेई हा बिझनेस व्हिसावर २००० साली नायजेरियातून भारतात आला. भारतीय कपडे नायजेरियात जाउन विक्रीचा व्यवसाय करीत हाेता. दरम्यान, त्याने मणिपुरी तरूणीशी प्रेमविवाह केला. सर्वप्रथम २०१४ मध्ये काेकेन तस्करीप्रकरणी कस्टम विभागाने त्याला अटक केली आणि गुन्हा दाखल केला. त्यामध्ये व्हिसा आणि पासपाेर्ट जप्त करण्यात आला. तेव्हापासून ताे भारतात लपून राहत हाेता. २०१९ मध्ये पुन्हा ताे काेकेन विक्री करताना पाेलिसांच्या जाळ्यात अडकला. तेव्हापासून त्याचा मुक्काम येरवडा कारागृहात हाेता.