आचारसंहिताभंग; ६७ तक्रारी

By admin | Published: February 16, 2017 02:42 AM2017-02-16T02:42:22+5:302017-02-16T02:42:22+5:30

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आतापर्यंत आचारसंहिताभंगाच्या ६७ तक्रारी दाखल झाल्या आहेत.

Code of conduct; 67 complaints | आचारसंहिताभंग; ६७ तक्रारी

आचारसंहिताभंग; ६७ तक्रारी

Next

पुणे : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आतापर्यंत आचारसंहिताभंगाच्या ६७ तक्रारी दाखल झाल्या आहेत. या तक्रारींची शहानिशा केल्यानंतर जिल्ह्यात ११ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा परिषद समन्वय अधिकारी विक्रांत चव्हाण यांनी दिली.
जिल्हा परिषदेच्या ७५ गटांसाठी, तर पंचायत समितीच्या १५० गणांसाठी
येत्या २१ फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे. यासाठी सध्या संपूर्ण
जिल्ह्यात आचारसंहिता सुरू असून, उमेदवारांच्या प्रचाराला जोर आल्याने आचारसंहिताभंगाचे आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
याअंतर्गत हवेली ३, जुन्नर ४, भोर १, इंदापूर १, मुळशी २ तर वेल्ह्यामध्ये एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवेलीमध्ये नंदकुमार किसनराव गोते व शिवांजली शिवाजीराव वाळके यांच्याविरोधात विनापरवानगी हळदीकुंकू, जेवणाचा तसेच होममिनिस्टर कार्यक्रम आयोजित केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हवेलीतील भाजपाच्या उमेदवार गौरी गायकवाड याच्यावर विनापरवाना रॅली काढल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, उमेदवाराचे नाव व काँग्रेस पक्षाचे चिन्ह विनापरवाना गाडीवर वापरल्याने मयूर जवळकर आणि अक्षय कामठे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वेल्ह्यामध्ये विनापरवाना बॅनर आणि स्पीकर लावल्याने गणेश प्रकाश कोळपे व दिगंबर दिनकर चोरघे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मुळशीमध्ये विनापरवाना मोटारसायकल रॅली काढल्याने गंगाराम कुंडलिक मातेरे, शिवाजी राजाराम बुचडे, तृप्ती मदन साळुंखे आणि अविनाश शिंदे तसेच सागर सोपानराव मारणे, मिनानाथ कानगुडेंसह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंदापूर येथे गाडीवर विनापरवाना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा व पोस्टर लावल्याने राजेंद्र भाकरे, अमोल लोंड व महेश देवकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. विनापरवाना कोपरासभा घेतल्याने भोर येथे माऊली विठ्ठल शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, जुन्नर येथे दाखल झालेल्या तीन गुन्ह्यांमध्ये विनापरवाना झेंडा लावल्याप्रकरणी शैलेश रखमाजी ढोले, राजेंद्र रघुनाथ घोगरे व प्रथमेश प्रसाद थोरवे यांच्यावर वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आचारसंहिताभंगाच्या तक्रारीबाबत जिल्हा प्रशासनाने १०७७ हा हेल्पलाईन नंबर दिला असून, त्यावर नागरिकांना आपली तक्रार फोनद्वारे कळविण्याचे आवाहन केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Code of conduct; 67 complaints

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.