सीओईपीला अभिमतची प्रतीक्षाच
By admin | Published: March 25, 2017 03:59 AM2017-03-25T03:59:46+5:302017-03-25T03:59:46+5:30
काही वर्षांपासून अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या शिवाजीनगर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाकडे
पुणे : काही वर्षांपासून अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या शिवाजीनगर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाकडे (सीओईपी) विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (यूजीसी) दुर्लक्ष केले जात आहे. शैक्षणिक दर्जा आणि क्षमता असून अभिमतचा दर्जा मिळत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
सीओईपीला यापूर्वीच स्वायत्तता मिळाली आहे. त्यानंतर महाविद्यालायाने सहा-सात वर्षांपूर्वी अभिमत दर्जा मिळविण्यासाठी पाठपुरावा सुरू केला. केंद्र सरकारसह यूजीसीकडेही सातत्याने हा पाठपुरावा करण्यात आला.
अभिमतसाठी राज्य शासनाच्या समितीनेही याबाबतचा अहवाल दिला आहे. स्वायत्तता मिळाल्यानंतर महाविद्यालयाचा शैक्षणिक दर्जा, संशोधन व इतर उपक्रमांमधील यशाचा आलेख वाढता आहे. तरीही यूजीसीकडून अद्याप समितीचीही नेमणूक करण्यात आलेली नाही. या समितीची नेमणूक झाल्यानंतर महाविद्यालयाची पाहणी होऊन अभिमतचा निर्णय घेतला जाणार आहे. मात्र, अद्यापही त्याबाबत यूजीसी उदासीन असल्याचे दिसून येते.
याविषयी संचालक डॉ. बी. बी. आहुजा म्हणाले, ‘‘यूजीसीने अद्याप समिती स्थापन केलेली नाही; त्यामुळे अभिमतचा प्रश्न रखडलेला आहे. हा दर्जा मिळाल्यास महाविद्यालयाला विविध क्षेत्रांत शैक्षणिकदृष्ट्या विविध प्रकारची संधी निर्माण होणार आहे. विद्यार्थिहिताचे विविध निर्णय घेता येतील.’’