Pune: सकाळी कडक थंडी अन् दुपारी मोकळे आकाश! कडक उन्हामुळे थंडीपासून दिलासा
By श्रीकिशन काळे | Published: January 15, 2024 03:52 PM2024-01-15T15:52:54+5:302024-01-15T15:53:08+5:30
गेल्या काही दिवसांपासून थंडीमुळे कुडकुडणाऱ्या नागरिकांना आजची दुपार दिलासा देणारी ठरली...
पुणे : गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे सूर्यदर्शन नीटसं होत नव्हते. परंतु, मकरसंक्रांतीच्या दिवशी आकाश मोकळे झाले आणि सूर्यनारायणाचे दर्शनही झाले. त्यामुळे दुपारी कडक उन्हाचा पुणेकरांनी आनंद घेतला. गेल्या काही दिवसांपासून थंडीमुळे कुडकुडणाऱ्या नागरिकांना आजची दुपार दिलासा देणारी ठरली. पण सकाळी मात्र थंडीचा चांगलाच कडाका जाणवत होता.
सध्या उत्तर भारतामध्ये थंडीचा चांगलाच कडाका जाणवत आहे. उत्तर भारतामधील अनेक भागात तसेच पुण्यातही सकाळी दाट धुक्याची चादर अनुभवायला मिळाली. सकाळी किमान तापमानाचा पारा १० अंश सेल्सिअस नोंदवला गेला. तर राज्यात थंडीला पोषक हवामान असून किमान तापमानात घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पुढील तीन दिवस उत्तर भारतामध्ये आणखी थंडी पसरणार असून, अतिदाट धुक्याची चादर कायम राहणार आहे.
पुणे शहरात गेल्या काही दिवसांमध्ये किमान तापमान १५ अंश सेल्सिअसवर नोंदवले जात होते. त्यात अचानक घट होऊन सोमवारी किमान तापमान १० अंश सेल्सिअस नोंदवली गेली. आज मकरसंक्रांत असल्याने सूर्य मकर राशीत प्रवेश करत आहे. त्यामुळे इथून पुढे थंडी हळूहळू ओसण्याची शक्यता आहे. सकाळपासून आकाश अतिशय स्वच्छ व निरभ्र पहायला मिळाले.
पुणे शहरातील किमान तापमान
एनडीए : १०.६
हवेली : ११.०
पाषाण : १०.७
शिवाजीनगर : १२.२
हडपसर : १४.७
कोरेगाव पार्क : १६.७
मगरपट्टा : १७.६
वडगावशेरी : १९.३