राज्यात थंडीचा कडाका वाढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:11 AM2021-01-17T04:11:22+5:302021-01-17T04:11:22+5:30
पुणे : राज्यात २० जानेवारीपासून पुन्हा एकदा थंडीची मध्यम लाट येण्याची शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा, विदर्भ, ...
पुणे : राज्यात २० जानेवारीपासून पुन्हा एकदा थंडीची मध्यम लाट येण्याची शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा, विदर्भ, उत्तर कोकणात थंडीचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. २२ व २३ जानेवारीनंतर पुणे, नाशिक येथील पारा १२ अंशाच्या खाली जाण्याची शक्यता आहे. मुंबई व परिसरातील किमान तापमानात घट होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
राज्यात शनिवारी सर्वात कमी किमान तापमान गोंदिया येथे ८.४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.
मध्य महाराष्ट्राच्या बहुतांश भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. मालेगाव येथे १७.६ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविले गेले. ते सरासरीच्या तुलनेत ७ अंशाने अधिक आहे.
मराठवाड्याच्या बर्याच भागात व कोंकण गोव्याच्या काही भागात किचिंत वाढ झाली आहे. पुढील पाच दिवस राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता असून किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे.येत्या दोन तीन दिवसात उत्तरेकडून येणार्या थंड वाऱ्याचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या तीन दिवसात किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे.
पुणे शहरात शनिवारी किमान तापमान १६ अंश सेल्सिअस नोदविले गेले. ते सरासरीच्या तुलनेत ५ अंशांनी अधिक आहे. त्यात आता घट होऊन २१ जानेवारीला ते १० अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरण्याची शक्यता आहे.