पुण्यात थंडीचा कडाका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2016 01:30 AM2016-01-21T01:30:37+5:302016-01-21T01:30:37+5:30
राज्यातील कोरड्या हवामानाचा आणि प्रवाही झालेल्या थंड वाऱ्यांचा परिणाम शहरातील गारव्यावर होऊ लागला आहे. शहरातील दिवसाच्या तापमानात सरासरीपेक्षा
पुणे : राज्यातील कोरड्या हवामानाचा आणि प्रवाही झालेल्या थंड वाऱ्यांचा परिणाम शहरातील गारव्यावर होऊ लागला आहे. शहरातील दिवसाच्या तापमानात सरासरीपेक्षा २ अंशांनी, तर रात्रीच्या तापमानात सुमारे सरासरीपेक्षा ३ अंशांनी घट झाल्याने शहरात थंडीचा कडाका वाढला आहे. बुधवारी शहराचे किमान तापमान ८.२ अंश सेल्सियस नोंदविण्यात आले आहे. यंदाच्या वर्षातील हे पुण्याचे नीचांकी तापमान म्हणून नोंदविण्यात आले आहे.
मागील तीन दिवसांपासून शहरातील थंडी वाढीस लागली आहे. दिवसाच्या तापमानात सातत्याने घट होत असल्याने बोचऱ्या थंड वाऱ्यांची जाणीव होत आहे. दिवसा सूर्यकिरणांची तीव्रता कमी असल्याने हवेत गारवा जाणवत आहे. त्यामुळे सकाळपासूनच आबालवृद्ध उबदार कपडे घालूनच घराबाहेर पडताना दिसत आहेत. रात्रीनंतर हवेत गारवा वाढत असल्याने रस्त्यावरची वर्दळ कमी दिसत आहे.
पहाटेच्या वेळेस दवबिंदूही पडत आहेत. बुधवारी पुण्याच्या दिवसाच्या तापमानात सरासरीपेक्षा २ अंशांनी घट होऊन २७.६ अंश सेल्सियस नोंदविण्यात आले आहे, तर किमान तापमानात २.८ अंशांनी घट होऊन ८.२ अंश सेल्सियस नोंदविण्यात आले आहे.
जानेवारी सुरू झाल्यापासून वाढलेल्या या थंडीने पुणेकर सुखावले असून, थंडीची मजा अनुभवण्यासाठी पहाटेच्या वेळेस नागरिक फिरण्यासही बाहेर पडताना दिसत आहेत. पुढील दोन दिवसही थंडीचा जोर राहणार असल्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.
(प्रतिनिधी)