काँग्रेसच्या दिग्गजांत शीतयुद्ध
By admin | Published: May 16, 2017 06:42 AM2017-05-16T06:42:04+5:302017-05-16T06:42:04+5:30
दर पंचवार्षिकमध्ये महापालिकेत नगरसेवकांची संख्या कमी होत असूनही काँग्रेसचे पदाधिकारी त्यातून काही शिकायला तयार नाहीत.
पुणे : दर पंचवार्षिकमध्ये महापालिकेत नगरसेवकांची संख्या कमी होत असूनही काँग्रेसचे पदाधिकारी त्यातून काही शिकायला तयार नाहीत. सध्या फक्त ९ नगरसेवक असूनही गटनेते अरविंद शिंदे व माजी उपमहापौर आबा बागुल यांच्यातील वाद पेटतच चालला असल्याचे दिसत आहे. महापालिकेतील अनुपस्थितीबद्दल नोटीस देणारे शिंदे यांना उत्तर देताना बागुल यांनी त्यांच्या तक्रारींचा पाढा थेट प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडेच पाठवला आहे.
मागील पंचवार्षिकमध्ये काँग्रेस सत्तेत होती. त्यांच्या नगरसेवकांची संख्या २९ होती. ती निवडणुकीत फक्त ९ इतकी झाली. तरीही त्या पंचवार्षिकमध्येच गटनेते असलेले शिंदे यांच्याच गळ्यात पदाधिकाऱ्यांनी पुन्हा गटनेतेपदाची माळ घातली. बागुल या वेळी सहाव्यांदा निवडून आले आहेत. त्यामुळेच या वेळी त्यांना पद मिळणे अपेक्षित होते; मात्र तसे झाले नाही. त्यामुळे त्यांचा राग आहे. त्यातच शिंदे यांनी त्यांना डावलणे सुरू केले आहे.
कौटुंबिक कारणांमुळे बागुल महापालिकेच्या काही सभांना अनुपस्थित होते. त्याबद्दल शिंदे यांनी बागुल यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. पक्षशिस्त भंग केल्याचा आरोप त्यांच्यावर केला व खुलासा देण्यास सांगितले. ही नोटीस प्रत्यक्षात बागुल यांना मिळालीच नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. नोटिशीच्या केवळ बातम्या प्रसिद्ध करून शिंदे यांनी आपली प्रतिमा भंग करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप आता त्यांनी केला आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी थेट प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनाच धाडले असून, त्यात शिंदे यांच्या अशा वागण्यामुळेच पक्षाचे अस्तित्व क्षीण झाल्याचे नमूद केले आहे.
आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ बागुल यांनी काही उदारहणेही दिली आहेत. आपण म्हणजेच पक्ष अशी शिंदे यांची महापालिकेत वागणूक असते. मागील ५ वर्षांत त्यांनी कधीही नगरसेवकांना विश्वासात घेतले नाही; उलट त्यांच्यात भांडणे लावली. त्यामुळेच नगरसेवकांची संख्या कमी झाली. आपल्याशिवाय अन्य कोणत्या नगरसेवकाला अस्तित्वच राहू नये, यासाठी महापालिकेतील पक्षात असलेली पदे त्यांनी आपल्या अधिकारात रद्द करून टाकली, असे बागुल यांनी म्हटले आहे.
काँग्रेसच्या या दोन दिग्गज नगरसेवकांचे हे शीतयुद्ध फक्त काँग्रेसच्याच नाही, तर अन्य पक्षांतील नगरसेवकांच्याही चर्चेचा विषय झाला आहे. काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी दखल घेतली, तरच आता यात काही होऊ शकते, अशी स्थिती आहे.