Maharashtra| राज्यात पुन्हा पारा घसरणार; उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात थंडीची लाट येण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 01:34 PM2022-01-31T13:34:01+5:302022-01-31T13:37:26+5:30

उत्तर भारतातील अनेक भागांत सध्या गारठा वाढला आहे....

cold wave in north maharashtra marathwada winter pune latest news | Maharashtra| राज्यात पुन्हा पारा घसरणार; उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात थंडीची लाट येण्याची शक्यता

Maharashtra| राज्यात पुन्हा पारा घसरणार; उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात थंडीची लाट येण्याची शक्यता

Next

पुणे : उत्तरेकडून येणाऱ्या शीत लहरीमुळे राज्यातील कमाल व किमान तापमानात घट होण्याची शक्यता असून उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यातील ९ जिल्ह्यांमध्ये थंडीची तीव्र लाट येण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्यात रविवारी सकाळी सर्वांत कमी किमान तापमान जळगाव येथे ५ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे. गेल्या १० वर्षांतील जानेवारी महिन्यातील जळगावचे हे सर्वांत निचांकी किमान तापमान आहे.

उत्तर भारतातील अनेक भागांत सध्या गारठा वाढला आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा परिणाम उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील काही भागांवर होत असून त्यामुळे येथील किमान तापमानात घट झाली आहे. ही स्थिती आणखी ४८ तास कायम राहून किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. दोन दिवसांनंतर पश्चिमी प्रभाव वाढण्याची शक्यता असून त्यामुळे २ ते ४ फेब्रुवारीदरम्यान काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

जळगाव शहरात रविवारी सकाळी किमान तापमान ५ अंश सेल्सिअसची नोंद झाली. सरासरीच्या तुलनेत ते ७.५ अंशांची घटले आहे. यापूर्वी गेल्या १० वर्षांत जानेवारी महिन्यातील सर्वांत कमी किमान तापमान ९ जानेवारी २०१९ रोजी ५.९ अंश सेल्सिअस नोंदविले गेले होते. जळगावात सर्वांत कमी ७ जानेवारी १९४५ रोजी १.७ अंश सेल्सिअस इतकी नोंद झाली होती.

राज्यातील प्रमुख शहरातील किमान तापमान (अंश सेल्सिअस) पुणे ८.९, लोहगाव ११.७, जळगाव ५, कोल्हापूर १५.३, महाबळेश्वर १३.७, मालेगाव ८.६, नाशिक ८.४, सांगली १४.९, सातारा १३.४, सोलापूर ११, मुंबई १८.५, सांताक्रूझ १६.४, रत्नागिरी १८, पणजी २०, डहाणू १४.५, औरंगाबाद ९.२, परभणी १०.५, नांदेड ९.६, अकोला १०.१, अमरावती ८.८, बुलढाणा १०.५, ब्रह्मपुरी ९.४. चंद्रपूर १०.२, गोंदिया ७.८, नागपूर ७.९, वाशिम ११, वर्धा ९.४.

या जिल्ह्यांना इशारा

उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक तसेच मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांमध्ये पुढील ४८ तास थंडीची तीव्र लाट येण्याची शक्यता असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

Web Title: cold wave in north maharashtra marathwada winter pune latest news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.