Winter Session Maharashtra : पुण्यासह राज्यात थंडीची लाट : अनेक शहरांत पारा १० अंशांच्याही खाली
By श्रीकिशन काळे | Updated: December 16, 2024 10:31 IST2024-12-16T10:29:33+5:302024-12-16T10:31:50+5:30
पुण्यातील कमाल तापमानदेखील ३० अंशांच्या आत आले आहे

Winter Session Maharashtra : पुण्यासह राज्यात थंडीची लाट : अनेक शहरांत पारा १० अंशांच्याही खाली
पुणे : उत्तरेकडील थंडीच्या वाऱ्यांचे प्रवाह तीव्र झाल्याने राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. सोमवारीदेखील राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट येईल, असा अंदाज हवामान खात्याने दिला. राज्यात नगरला सर्वांत कमी नीचांकी तापमान ६.४ अंशांवर नोंदले गेले, तर पुण्यात रविवारी (दि.१५) एनडीए भागात आठ अंश, तर शिवाजीनगरला ९ अंशांवर तापमान नोंदविले गेले.
पुणे शहरासह जिल्ह्यातील विविध भागांत १० अंश सेल्सिअसखाली तापमान आले आहे. रविवारी (दि.१५) पहाटे एनडीए भागात सर्वांत कमी आठ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. शनिवारपासूनच किमान तापमानात घट झाली होती. त्यामुळे रविवारची सकाळ पुणेकरांसाठी कडाक्याची थंडी होती. तसेच पुढील दोन दिवस थंडीचा जोर कायम राहणार आहे. त्यानंतर आकाश निरभ्र राहील आणि सकाळी हलकेसे धुके पडेल, असा अंदाज हवामान खात्याने दिला. पुण्यातील कमाल तापमानदेखील ३० अंशांच्या आत आले आहे. पाषाणला २७.८, भोरला २८.५, तर शिवाजीनगरला २९.६ कमाल तापमान नोंदविले गेले.
राज्यात थंडीचा कडाका जाणवत असून, अनेक शहरांचे तापमान १० अंशांच्या खाली नोंदविले गेले. राज्यातील नीचांकी किमान तापमान अहिल्यानगरमध्ये ६.४ एवढे नोंदविले गेले. त्यानंतर जळगाव, छ. संभाजीनगर, परभणी, अकोला, गोंदिया, नागपूर, वर्धा येथे ७ ते ८ अंशांवर तापमान होते.
राज्यात येथे थंडीची लाट
राज्यात सोमवारी (दि.१६) पुण्यासह जळगाव, नगर, छ. संभाजीनगर, जालना, परभणी, बीड आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट असेल, असा अंदाज देण्यात आला आहे.
पुण्यातील किमान तापमान
एनडीए : ८.०
माळीण : ९.०
दौंड : ९.०
शिवाजीनगर : ९.०
बारामती : ९.०
शिरूर : ९.०
पाषाण : ९.३
नारायणगाव : ९.७
राजगुरूनगर : ९.९
इंदापूर : १०.६
पुरंदर : १०.६
कोरेगाव पार्क : १४.१
वडगावशेरी : १५.७
मगरपट्टा : १५.९
लोणावळा : १६.८
राज्यातील किमान तापमान
नगर : ६.४
पुणे : ९.०
जळगाव : ७.९
महाबळेश्वर : १२.५
नाशिक : १०.६
सातारा : १२.१
सोलापूर : १४.०
मुंबई : २२.४
छ. संभाजीनगर : ८.८
परभणी : ८.६
अकोला : ९.६
गोंदिया : ७.२
वर्धा : ७.४