Maharashtra| उत्तरेतील बर्फवृष्टीमुळं पारा घसरला; मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट येण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 10:33 AM2022-01-25T10:33:17+5:302022-01-25T10:38:03+5:30
पाकिस्तानमधून आलेल्या धुळीच्या वादळाने कोकण, मध्य महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी दृष्टमानता कमी झाली होती
पुणे : उत्तरेकडील राज्यात पडत असलेला पाऊस, हिमालयीन पर्वत रांगात होत असलेल्या बर्फवृष्टीचा परिणाम मध्य भारतावर झाला असून, अनेक ठिकाणी किमान तापमानात मोठी घट झाली आहे. मध्य महाराष्ट्रात पुढील दोन दिवस थंडीची लाट येण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्यात महाबळेश्वर येथे सर्वात कमी किमान तापमान ६.५ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे. पुढील ५ दिवसांत उत्तर पश्चिम आणि मध्य भारताच्या बहुतांश भागांमध्ये किमान तापमानात ३ ते ५ अंश सेल्सिअसने हळूहळू घट होण्याची शक्यता आहे.
पाकिस्तानमधून आलेल्या धुळीच्या वादळाने कोकण, मध्य महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी दृष्टमानता कमी झाली होती. अरबी समुद्रावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्याचा जोर कमी झाल्याने उत्तरेकडून येणाऱ्या थंड हवेमुळे राज्यातील तापमानात घट झाली आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणच्या किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत घट झाली होती. कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे. २५ व २६ जानेवारी रोजी उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्यता आहे.
राज्यातील प्रमुख शहरातील किमान तापमान (अंश सेल्सिअस) पुणे १०.४, लोहगाव १३.५, जळगाव ९.२, महाबळेश्वर ६.५, कोल्हापूर १६.१, मालेगाव ९.६, नाशिक ६.६, सांगली १६.४, सातारा १४.९, सोलापूर १४, मुंबई १६.२, सांताक्रूझ १५, अलिबाग १४.७, रत्नागिरी १८.९, पणजी २०.८, डहाणू १३.६, औरंगाबाद १०.२, परभणी १२.९, नांदेड १४.६, बीड १३.२, अकोला १३.४, अमरावती १३.७, बुलडाणा ११, ब्रह्मपुरी १४.१, चंद्रपूर १४.२, नागपूर १४.३, गोंदिया १३, वर्धा १३.