थंडीचा कडाका अजूनही दूरच...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 02:19 AM2018-11-25T02:19:26+5:302018-11-25T02:20:01+5:30
पुणे : अरबी समुद्रात नुकताच निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा आणि राज्यात असलेल्या ढगाळ हवामानामुळे अजूनही तापमानात मोठे चढ-उतार ...
पुणे : अरबी समुद्रात नुकताच निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा आणि राज्यात असलेल्या ढगाळ हवामानामुळे अजूनही तापमानात मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहे़ पुढील काही दिवस किमान तापमानात असेच चढ-उतार होण्याची शक्यता असून कडाक्याच्या थंडीसाठी अजून काही दिवस वाट पहावी लागणार आहे़ राज्यात अनेक ठिकाणी सध्या सरासरीच्या जवळपास किमान तापमान आहे़ राज्यात शनिवारी सर्वांत कमी तापमान अहमदनगर येथे १२़४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले़ ते सरासरी किमान तापमानापेक्षा २़४ अंशाने घटले आहे.
शनिवारी सकाळी संपलेल्या २४ तासात कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला़ मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात हवामान कोरडे होते़ मध्य महाराष्ट्राच्या काही भागात तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे़ तर कोकण, गोव्याच्या काही भागात किंचित वाढ झाली आहे़ दक्षिणेत अद्याप तमिळनाडू, केरळ मध्ये सध्या जोरदार पाऊस पडत असून त्याचा परिणाम आपल्याकडे झाला आहे़ पुढील दोन आठवड्यात मध्य भारत, पश्चिम भारतातील अनेक ठिकाणी किमान तापमान हे सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे़
पुण्यात दोन आठवड्यांपूर्वी राज्यातील सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली होती़ त्यानंतर किमान तापमानात सातत्याने चढ-उतार होत आहे़ पुण्यात शनिवारी १२़७ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे़ यापुढील चार ते पाच दिवसांत किमान तापमानात वाढ होऊन ते १३ अंश सेल्सिअसच्या जवळपास राहण्याची शक्यता आहे़