पुण्यात थंडीचा कडाका; शहरात ११.७ तापमानाची नोंद, अजून २ - ३ दिवस गारठा जाणवणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2023 10:03 AM2023-12-26T10:03:50+5:302023-12-26T10:04:26+5:30

अनेक जण थंडीमध्ये टेकडीवर, गार्डनमध्ये फिरायला जात असल्याचे दिसून येत आहे

Cold weather in Pune The city recorded a temperature of 11.7 degrees Celsius it will feel cold for another 2-3 days | पुण्यात थंडीचा कडाका; शहरात ११.७ तापमानाची नोंद, अजून २ - ३ दिवस गारठा जाणवणार

पुण्यात थंडीचा कडाका; शहरात ११.७ तापमानाची नोंद, अजून २ - ३ दिवस गारठा जाणवणार

पुणे : शहरात किमान तापमानात घट झाल्याने पाषाणला १०.१ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. शिवाजीनगर भागातही ११.७ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. आकाश निरभ्र असले तरी हवेत गारठा जाणवत आहे. अजून दोन-तीन दिवस असाच गारठा जाणवणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. राज्यात सर्वांत कमी किमान तापमान ९.६ अंश सेल्सिअस जळगावला नोंदवले गेले.

गेल्या दोन दिवसांपासून गारठ्यामध्ये वाढ झाली आहे. किमान तापमान १० अंशांच्याही खाली गेले आहे. रविवारी राज्यातील सर्वाधिक कमी किमान तापमान पाषाण येथे ९ अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते. साेमवारी त्यात किंचित वाढ होऊन १०.१ अंश सेल्सिअस झाले आहे. येत्या २८ डिसेंबरपर्यंत असेच तापमान राहील. ३० डिसेंबरनंतर ढगाळ वातावरण असेल, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.

अनेक जण थंडीमध्ये टेकडीवर, गार्डनमध्ये फिरायला जात असल्याचे दिसून येत आहे. पहाटे धुके पडत आहेत. वडगावशेरी, मगरपट्टा, कोरेगाव पार्क या परिसरातील किमान तापमान १६ ते १८ अंश सेल्सिअस दरम्यान नोंदवले गेले.

उत्तर भारतातून येणाऱ्या उच्चपातळीवर थंडी व दक्षिण भारतातून महाराष्ट्रापर्यंत निम्न पातळीतून पोहोचणाऱ्या पूर्वझोती वाऱ्यांच्या मिलाफातून फक्त मध्य महाराष्ट्रातील खान्देश, नाशिक, नगर ते सोलापूरपर्यंतच्या १० जिल्ह्यात २९ डिसेंबरला ढगाळ वातावरण जाणवेल. तसेच धाराशिव व लातूर जिल्ह्यातही ३१ डिसेंबर ते २ जानेवारी २०२४ या तीन दिवसांत नववर्षात ढगाळ वातावरण जाणवेल. त्यामुळे काहीशी थंडी ओसरून उबदारपणा जाणवेल. - माणिकराव खुळे, हवामानतज्ज्ञ

नव्या वर्षात ढगांची सलामी 

येत्या आठवडाभर आकाश निरभ्र राहणार असून, नव्या वर्षात मात्र ढगाळ वातावरणाची सलामी अनुभवायला मिळणार आहे. ३० व ३१ डिसेंबरनंतर ढगाळ वातावरण असेल, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. ख्रिसमसला थंडी पडली आणि नव्या वर्षाचे स्वागतासाठी आकाशात ढगांची सलामी मिळेल.

शहरातील किमान तापमान

पाषाण : १०.१
हवेली : १०.६
एनडीए : ११.१
शिवाजीनगर : ११.७
कोरेगाव पार्क : १६.३
मगरपट्टा : १७.८
वडगावशेरी : १८.६

Web Title: Cold weather in Pune The city recorded a temperature of 11.7 degrees Celsius it will feel cold for another 2-3 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.