पुण्यात थंडीचा जोर
By admin | Published: January 23, 2016 02:41 AM2016-01-23T02:41:33+5:302016-01-23T02:41:33+5:30
गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील थंडीचा कडाका वाढला असून, झोंबणारी थंडी पुणेकर अनुभवत आहेत. शुक्रवारी पुण्याचा किमान तापमानाचा पारा आणखी घसरून
पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील थंडीचा कडाका वाढला असून, झोंबणारी थंडी पुणेकर अनुभवत आहेत. शुक्रवारी पुण्याचा किमान तापमानाचा पारा आणखी घसरून ७.३ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आला. गेल्या पाच वर्षांपासून जानेवारीमध्ये तापमानात मोठ्या प्रमाणात घसरण होत असून जानेवारी महिना कडाक्याच्या थंडीचा ठरत आहे.
थंडीचा हंगाम सुरू झाल्यानंतर जानेवारीमध्ये कडाक्याची थंडी पडण्यास सुरुवात होते. मागील पाच वर्षांत शहरातील थंडीची आकडेवारी पाहता किमान तापमान ५ ते ७ अंशांपर्यंत घसरल्याचे हवामानशास्त्र विभागाने नोंदविलेल्या नोंदीवरून स्पष्ट झाले आहे. मागील वर्षी ११ व १२ जानेवारी रोजी किमान तापमान ७ अंशांपर्यंत घसरला होता, तर गेल्या चार वर्षांपासून सातत्याने तापमान ७ ते ७.५ अंशांपर्यंत खाली घसरत आहे. त्यामुळे पुणेकरांना जानेवारीमध्येच थंडीचा पुरेपूर अनुभव घेता आला आहे. जानेवारीतील बोचऱ्या थंड वाऱ्याच्या प्रवाहामुळे जानेवारीमध्ये जर्किन, मफलर, स्वेटर असा ऊबदार जामानिमा करूनच पुणेकर बाहेर पडताना दिसतात. यंदाच्या वर्षी जानेवारीच्या पहिल्या टप्प्यात थंडी गायब झाली होती, मात्र पुन्हा उत्तरेकडून येणारे थंड वारे प्रवाही झाले आणि थंडी पुन्हा सक्रिय झाली आहे.
शुक्रवारी तापमान ७.३ अंशांपर्यंत घसरला आहे. किमान तापमानात सरासरीच्या ३ अंशांनी घट झाली आहे. गेल्या सप्ताहातील ही नीचांकी नोंद आहे.