पुण्यासह राज्यात 'हुडहुडी'थंडीची चाहूल! उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा वाढला जोर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2020 08:32 PM2020-11-05T20:32:28+5:302020-11-05T20:39:34+5:30

दिवसाच्या तापमानातही हळू हळू घट होऊ लागली असून सायंकाळ होताच थंड वाऱ्यांची झुळूक जाणवण्यास सुरुवात झाली आहे.

'coldness' increased in Pune and states! Decrease in minimum temperature | पुण्यासह राज्यात 'हुडहुडी'थंडीची चाहूल! उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा वाढला जोर

पुण्यासह राज्यात 'हुडहुडी'थंडीची चाहूल! उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा वाढला जोर

Next
ठळक मुद्देपुढील दोन दिवसात तापमान ३१ व १५ अंश सेल्सिअसच्या जवळपास राहण्याची शक्यता

पुणे : उत्तरेत बर्फ पडण्यास सुरुवात झाली असून उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा जोर वाढू लागला आहे. त्यामुळे पुण्यासह राज्यात थंडीचा कडाका वाढण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून पुण्यातील किमान तापमान सरीसरीच्या तुलनेत घसरु लागले आहे. शहरात गुरुवारी किमान तापमान १५.३ अंश सेल्सिअसची नोंद झाली़ ते सरासरीच्या तुलनेत ०.७ अंशाने घटले आहे.

मॉन्सूनचा परतीचा प्रवास यंदा १३ दिवस लांबला. ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने राज्यात मोठ्या प्रमाणावर धुमाकुळ घातला.पुण्यात ऑक्टोबर महिन्यात गेल्या १० वर्षातील सर्वाधिक पावसाची नोंद झाली. तसेच एकाच दिवसात सर्वाधिक पाऊस पडला. २८ ऑक्टोबरला मॉन्सून देशातून माघारी परतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. त्यावेळी पुण्यात कमाल व किमान तापमान अनुक्रमे ३२.६ व १८.९ अंश सेल्सियस इतके नोंदविले गेले होते़ ते सरासरीच्या तुलनेत २.५ अंशाने अधिक होते. त्यानंतर कमाल व किमान तापमानात घट होऊ लागली.

दिवसाच्या तापमानातही हळू हळू घट होऊ लागली असून सायंकाळ होताच थंड वाऱ्यांची झुळूक जाणवण्यास सुरुवात झाली आहे. सकाळी व्यायामासाठी बाहेर पडणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी कानटोपी, स्वेटर बाहेर काढल्याचे दिसून येऊ लागले आहे.
पुढील दोन दिवसात शहरात हवामान कोरडे राहण्याची शक्यता असून तापमान ३१ व १५ अंश सेल्सिअसच्या जवळपास राहण्याची शक्यता आहे. 
..........
पुणे शहरातील कमाल व किमान तापमान (अंश सेल्सिअस)
दिवस              कमाल                    किमान
२८ ऑक्टोबर    ३२.६                      १८.९
३० ऑक्टोबर    ३२.३                      १८
१ नोव्हेंबर        ३१.८                      १७.१
२ नोव्हेंबर         ३१.४                     १८.८
३ नोव्हेंबर         ३१.३                     १७.२
४ नोव्हेंबर         ३२.१                     १५.१
५ नोव्हेंबर         ३१.४                     १५.१

मास्कचा असाही फायदा
रात्री अपरात्री अथवा पहाटे घराबाहेर पडणाऱ्यांना थंड वाऱ्यांचा सर्वाधिक त्रास होतो. सध्या नाकाला मास्क घालणे बंधनकारक असले तरी अनेकांना ते नकोसे वाटते. मात्र, रात्री उशिरा अथवा पहाटे बाहेर पडणाऱ्यांना थंड वाऱ्यांपासून नाकाचे सरंक्षण होत असल्याने त्याचा आधार वाटत आहे.

Web Title: 'coldness' increased in Pune and states! Decrease in minimum temperature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.