मेट्रोवरून कलगीतुरा
By admin | Published: November 22, 2014 12:22 AM2014-11-22T00:22:38+5:302014-11-22T00:22:38+5:30
शहराच्या मेट्रो प्रकल्पास मान्यता देण्यास केंद्रशासनाकडून होत असलेला विरोध आणि जागेचे कारण पुढे करीत
पुणे : शहराच्या मेट्रो प्रकल्पास मान्यता देण्यास केंद्रशासनाकडून होत असलेला विरोध आणि जागेचे कारण पुढे करीत, राज्यशासन आणि केंद्रशासन राजकरण करून पुण्यावर सूड उगवत असल्याचा आरोप काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी शुक्रवारी महापालिकेच्या मुख्य सभेत केला. या आरोपास भाजप नगरसेवकांनीही जोरादार प्रत्त्युत्तर देत सत्तेत असताना, काँग्रेस-राष्ट्रवादीला हे प्रकल्प मंजूर करता आले नाहीत. त्यामुळे त्यांनी हा प्रश्न विचारू असे सुनावले. त्यामुळे सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
महापालिकेची सर्वसाधारण सभा सुरू होताच काँग्रेसचे विरोधी पक्ष अरविंद शिंदे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. राज्यामध्ये सर्वांत अगोदर पुणे शहराने मेट्रोचा आराखडा तयार करून पाठवला होता. मात्र, पुण्याच्या अगोदर नागपूर मेट्रोला केंद्राने मंजुरीदेऊन प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे. पुणे शहर हे विद्येचे माहेरघर असताना पुण्यातील बहुचर्चित आयआयएम संस्था नागपूरला घेऊन जाण्यात भाजप यशस्वी ठरली आहे. पुणेकर याचा जाब विचारल्याशिवाय राहणार नाहीत, असे ते म्हणाले.
उपमहापौर आबा बागूल म्हणाले, की पुण्याची मेट्रो आणि आयआयएम संस्था नागपूरला पळवण्यात आली. आता शनिवारवाडासुद्धा पळवला जाईल, अशी टीका केली. या वेळी दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांमध्ये चांगलीच शाब्दिक खडांजगी झाली. शहराच्या प्रलंबित प्रश्नांबाबत भाजपचे खासदार आणि आठही आमदारांना पत्र देऊन केंद्रशासनाकडे प्रलंबित विषय मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करण्याचा निर्णय घेऊन या वादावर पडदा टाकण्यात आला.
(प्रतिनिधी)