इमारतीच्या बांधकामाला ‘निधी’चा अडसर
By admin | Published: December 17, 2015 02:10 AM2015-12-17T02:10:19+5:302015-12-17T02:10:19+5:30
सत्ताबदलाचा फटका नव्याने बांधकाम होत असलेल्या पंचायत समित्यांच्या इमारतींना बसला आहे. बारामती पंचायत समितीचे काम मागील वर्षभरापासून निधी अभावी रखडले आहे.
बारामती : सत्ताबदलाचा फटका नव्याने बांधकाम होत असलेल्या पंचायत समित्यांच्या इमारतींना बसला आहे. बारामती पंचायत समितीचे काम मागील वर्षभरापासून निधी अभावी रखडले आहे. काम पूर्ण करण्यासाठी पंचायत समितीने ९ कोटी रुपयांची मागणी केली आहे.
संसद भवन सदृश्य गोलाकार पंचायत समिती इमारतीचे बांधकाम होणार आहे. दोन वर्षापूर्वी इमारतीच्या नवीन बांधकामाला सुरुवात झाली. साधारणत: १३ कोटी रुपये खर्च या इमारतीला येणार आहे. सुरुवातीला साडेतीन कोटी रुपये उपलब्ध झाले. त्यातून पहिला टप्पा पूर्ण करण्यात आला. उर्वरित निधी उपलब्ध होण्यापूर्वी सत्तांतर झाले. इमारतीचे पूर्ण बांधकाम होण्यासाठी ९ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. मात्र, मागील वर्षभरापासून यासाठी पाठपुरावा ग्रामीण विकास मंत्रालयाकडे सुरू आहे. या ९ कोटी रुपयांमध्ये इमारतीचे उर्वरित बांधकाम, फर्निचर, इलेक्ट्रिफिकेशन आदी कामे करण्यात येणार आहे.
सभापती करण खलाटे, गटविकास अधिकारी राजनंदिनी भागवत यांनी सांगितले की, वर्षभरापासून निधीसाठी पाठपुरावा सुरू आहे. त्यामुळे काम रखडले आहे. ग्रामविकास मंत्रालयाकडून लवकरच टेंडर प्रक्रिया होईल. निधी उपलब्ध होईल, असे सांगितले आहे.
कामामुळे कार्यालये विखुरलेली...
इमारतीचे काम सुरू असल्यामुळे पंचायत समितीचे काही विभाग नगरपालिकेच्या सार्वजनिक सांस्कृतिक भवनामध्ये स्थलांतरीत करण्यात आले आहे. काही विभागांना पंचायत समितीच्या जुन्या इमारतीमध्ये कसेबसे बसविण्यात आले आहे. ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना त्याचा त्रास होतो. त्यामुळे इमारतीचे काम लवकर पूर्ण झाल्यास विखुरलेली कार्यालये एकाच इमारतीच्या छताखाली येतील.