दरड कोसळून भीमाशंकर-पाटणचा आहुपे खोर्याशी संपर्क तुटला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2019 05:01 PM2019-07-08T17:01:56+5:302019-07-08T17:04:48+5:30
भीमाशंकर-पाटण खोर्याची नाळ आहुपे खोर्याशी जोडणारा कुशिरे भोईरवाडी रस्त्यावर असणार्या घाटामध्ये ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्या आहेत.
पुणे (तळेघर) : भीमाशंकर-पाटण खोर्याची नाळ आहुपे खोर्याशी जोडणारा कुशिरे भोईरवाडी रस्त्यावर असणार्या घाटामध्ये ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्या आहेत. त्यामुळे भीमाशंकर-पाटण खोर्याचा आहुपे खोर्याशी संपर्क तुटला आहे.
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर- पाटण व आहुपे खोर्यामध्ये गेल्या आठ दहा दिवसांपासुन मुसळधार पाऊस पडत आहे. कुशिरे भोईरवाडी रस्त्यावर असणार्या अतिशय अवघड अशा या नागमोडी वळणाच्या घाटामध्ये ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्या आहेत तर काही ठिकाणी रस्ता वाहुन गेल्यामुळे हा घाट अक्षरश: मृत्युचा सापळा बनला आहे.
चालु वर्षी हा घाट रस्ता नव्याने दुरुस्त करण्यात आला परंतु हा रस्ता करणार्या अधिकारी व ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे हा घाट संपुर्णत: वरील बाजुस कोरण्यात आला आहे या मध्येच या भागामध्ये सलग आठ दहा दिवसांपासुन पडणारा मुसळधार पाऊस यामुळे घाटाच्या कडेला असणार्या डोंगरावरचे मोठमोठे दगड व माती रस्त्यावर आल्यामुळे आहुपे खोर्याचा भीमाशंकर व पाटण खोर्याशी येणारा संपर्क तुटला आहे. आहुपे खोर्यातील गावे ही अतिशय डोंगर दर्या खोर्यांमध्ये वसली आहेत आहुपे खोर्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या सोई सुविधा नसल्यामुळे या भागातील आदिवासी जनतेला भीमाशंकर खोर्यामध्ये नेहमीच यावे जावे लागते आहुपे भागातील आदिवासी बांधवांची नेहमीच पाटण व भीमाशंकर परिसरामध्ये दररोजची वर्दळ आहे.
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भाग हा अत्यंत दुर्गम भाग असल्यामुळे या भागामध्ये करण्यात येणारी कामे अत्यंत निकृष्ठ दर्जाची व जिवावर आल्यासारखी केली जात आहेत. प्रशासनाने आदिवासी जनतेची दखल घेत तात्काळ ह्या घाटाची दुरुस्ती करावी अशी मागणी कुशिरे भोईरवाडी ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच दिगांबर भोईर माजी उपसरपंच दिलीप मुद्गुण यांनी केली आहे.