पैसे मिळवण्यासाठी सह्या घ्या अन् सभेनंतर भेटा; अनेकांना भाषणापेक्षा सह्यांची चिंता
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2024 04:02 PM2024-05-12T16:02:42+5:302024-05-12T16:04:25+5:30
सध्याच्या परिस्थितीत राजकीय पक्षांना, नेत्यांना कार्यकर्त्यांची फौज उभे करणे शक्य नसल्याने, आपल्यावरील प्रेम दाखविण्यासाठी अशा विकतच्या प्रेमाचा आधार
निलेश राऊत
पुणे: निवडणूक ती कोणतीही असो मग ग्रामपंचायत पासून ते लोकसभेपर्यंत. या निवडणुकीत प्रचार सभांना गर्दी जमविणे म्हणजे मोठे चॅलेंज. व आलेली लोक शेवटपर्यंत म्हणजे सभा संपेपर्यंत थांबविणे ही मोठी कसोटीच. पण यात स्लिप वरील सह्यांचा सध्या चांगला फंडा दिसून येत आहे.
आजमितीला लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडत आहे. दोन दिवसात जाहीर प्रचार संपेल. मतदानाची तारीख जशी जवळ येऊ लागली तशी प्रचार यंत्रणेने जोर धरला आहे. पक्ष पातळीवर, उमेदवारांकडून मोठ्या प्रचार सभांचे आयोजन केले जाते. राज्यात अनेक ठिकाणी एक दिवसात दहा दहा सभा, बाईक रॅली, पदयात्रा आदींचे आयोजन होते. या सर्व ठिकाणी लोकांची झालेली गर्दी ही त्या उमेदवाराची ताकद दाखवणारी ठरते. याचा इतर मतदारांवर मोठा प्रभाव पडतो असा गोड गैर समज असू ही शकतो. पण खरोखरच या सभांना पदयात्रा, रॅली याला उपस्थित असलेले सर्व जण स्वखुशीने येतात का हा संशोधनाचा विषय आहे.
या प्रचार सभांना झालेल्या गर्दीतील अनेकांना व्यासपीठावरून मोठमोठी भाषणे ठोकणाऱ्यांमध्ये काहीच रस दिसून येत नाही. त्यांना केवळ आपल्याकडील स्लिप वर ( त्या कार्यक्रमाला येण्यासाठी व शेवटपर्यंत होतो/होती, हे दाखविण्यासाठी) एखाद्या प्रमुख कार्यकर्त्यांची किंबहुना यासाठी नियुक्त असल्याची सही कधी मिळते यासाठी धडपड दिसून येते. कारण या स्लिपवर सही मिळाली तरच त्याला नंतर अमुक एक ठिकाणी ठरवून दिलेले पैसे मिळणार असतात. हा प्रकार लपून झाला पाहिजे याची काळजी प्रमुख कार्यकर्ते घेतात. पण ज्याला स्लिप मिळाली आहे व सभा स्थानी हजेरी झाली की घरी जाण्याची घाई आहे. असा उपस्थित ( तो मतदार असेल असे नाही) व्यक्ती आपली ही सहीची व्याकूळता लपवू शकत नाही. त्यामुळेच असे प्रकार इतर सुजान मतदारांच्या लक्षात येतात. व त्या गर्दीचे बिंग फुटते. असो, सध्याच्या परिस्थितीत राजकीय पक्षांना, नेत्यांना कार्यकर्त्यांची फौज उभे करणे शक्य नसल्याने, आपल्यावरील प्रेम दाखविण्यासाठी अशा विकतच्या प्रेमाचा आधार घ्यावा लागत आहे.
आता भेळी चे दिवस गेले,गाडीचे पेट्रोल व रात्रीच्या पार्टीचे काय
आमचा माणूस मग तो कोणत्याही पक्षाचा असो. तो निवडणुकीत उभा राहिला की, त्याचे कार्यकर्ते तन मन धनाने त्याचे मागे उभे राहत. ऊन वारा पाऊस न पाहता केवळ एक वेळच्या सामूहिक भेळीच्या मैफलीत आपला थकवा घालवत. पण काळ बदलला व भेळी च्या मैफली चे ते दिवस सरले अन गाडीचे पेट्रोल व रात्रीच्या पार्टीचे काय असा प्रश्न आहे ते व येणारे कार्यकर्ते विचारात आहेत. आपला नेता उद्या आहे त्याच पक्षात राहील की पक्ष बदल करेल याची कुठलीही शाश्वती राहिली नाही. त्यांच्यासाठी जीवाचे रान करायचे व त्यांनीच आपल्याला आधांतरी सोडायचे हे प्रकार गेल्या काही वर्षात राज्यात अनेक ठिकाणी घडले आहेत. सोशल मीडियावर ही याबाबत चांगल्याच रील वेगवेगळ्या प्रकारे फिरत आहेत.
सर्वच कार्यकर्ते एक समान आहेत असे नाही काही उमेदवाराचे, ( नेत्यांचे) पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते आजही आहेत पण ते मोजकेच. तुम्ही आमच्याकडे येणार तेही निवडणुकीपूरतेच तर याना का सोडायचे. असा पवित्रा अनेकांनी घेतला आहे. याचा चांगला अनुभव महापालिका सभागृहाची मुदत समपल्यावर आला होता. आता निवडणूक होणार म्हणून अनेकांनी कार्यकर्त्यांसाठी सहली, त्याचा खर्च, जेवणाच्या पंगती उठल्या. पण झाले उलटेच निवडणुका लांबल्या. हे हात आखडले गेले. अनेकांची सम्पर्क कार्यालये बंद झाली. काही नेते भेटेनासे झाले. पण आता हेच नेते लोकसभेच्या निमित्ताने पुढे आले आहेत. भविष्यातील महापालिका व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना आपलेसे करत आहेत.