चाकणला नगरपरिषदेकडून चार हजार गणेश मूर्ती संकलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:11 AM2021-09-21T04:11:26+5:302021-09-21T04:11:26+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले होते. चाकण शहरातील नागरिकांनी गणेश मूर्तीची मिरवणूक काढून नदीमध्ये ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले होते. चाकण शहरातील नागरिकांनी गणेश मूर्तीची मिरवणूक काढून नदीमध्ये विसर्जन करू नये, गणेश मूर्ती दान करण्याचे आवाहन केले होते. त्याला चाकणकर नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. गणेश मूर्ती संकलित करण्यासाठी चाकण नगरपरिषदने शहरात २९ ठिकाणी गणेश मूर्ती संकलन केंद्रे सुरू केली होती. यासाठी शहरातील अंधश्रद्धा निर्मूलन समिती, वसुंधरा बहुउद्देशीय संस्था,वनविभाग रेस्क्यू टीम,कलाविष्कार मंच,अष्टविनायक मित्र मंडळ आदी गणेश मंडळांनी या उपक्रमात सहभाग घेतला होता.
चाकण शहरातील २९ गणेश मूर्ती संकलित केंद्रांवर शहरातील चार हजारपेक्षा अधिक गणेशमूर्तींचे संकलन झाले. यापैकी जवळपास अडीच हजार मूर्ती मूर्ती कारखान्यांना पुनर्वापरासाठी देण्यात आल्या, तर उर्वरित मूर्तींचे मोई येथील खाणीमध्ये नगरपरिषदच्या वतीने विसर्जन करण्यात आले. यासाठी पालिकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने आपला सहभाग नोंदवला. सर्व कार्यक्रम कोरोनाचे नियम पाळून साजरा करण्यात आला आहे. मूर्ती संकलन केंद्रावर गणेशाचे निर्माल्य वेगळ्या ठिकाणी गोळा केले गेले.या निर्माल्यापासून नगरपरिषद खत निर्मिती करणार असल्याचे मुख्याधिकारी नानासाहेब कामठे यांनी सांगितले.
चाकण नगरपरिषदकडून शहरात जवळपास २९ गणेश मूर्ती संकलन केंद्र निर्माण करण्यात आली होती. मात्र, यातील काही केंद्रांवर पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित नसल्याने गणेश मूर्ती दान करणाऱ्या गणेश भक्तांना नाइलाजाने भामा नदीवर जाऊन गणेश मूर्ती विसर्जित करावे लागेल. एकंदरीत पालिकेच्या भोंगळ कामाचा फटका गणेशभक्तांना बसला असल्याने नागरिकांकडून पालिकेच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
चाकण नगरपरिषदकडून शहरातील गणेश मूर्ती संकलित करून विसर्जित करताना.
200921\1434-img-20210920-wa0008.jpg
चाकण नगरपरिषदकडून शहरातील गणेश मूर्ती संकलित करताना.