पुणे जिल्ह्यात अफूची सामूहिक शेती, १ कोटी ४१ लाखांचा मुद्देमाल जप्त; चार जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2023 03:40 PM2023-03-04T15:40:33+5:302023-03-04T15:40:44+5:30
एन.डी.पी. एस.कायदा १९८५ चे कलम ८,१५, १८, ४६ प्रमाणे गुन्हा दाखल...
इंदापूर (पुणे) : पळसदेवनजिक माळेवाडीच्या हद्दीत अफूची सामुहिक शेती करणाऱ्या सहा शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल करुन त्यापैकी चार जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून इंदापूर पोलिसांनी १ कोटी ४१ लाख ७४ हजार रुपयांची ७ हजार ८७ किलो वजनाची झाडे जप्त केली आहेत. काशीनाथ रामभाऊ बनसुडे, दत्तात्रय मारुती बनसुडे, राजाराम दगडु शेलार, लक्ष्मण सदाशिव बनसुडे, माधव मोतीराम बनसुडे, रामदास जगन्नाथ शिंदे (सर्व रा. माळेवाडी, पळसदेव, ता.इंदापूर) अशी आरोपींची नावे आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार यांनी त्यांच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे. एन.डी.पी. एस.कायदा १९८५ चे कलम ८,१५, १८, ४६ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
आरोपींनी त्यांच्या माळेवाडी गावच्या हद्दीतील जमिनीवर थोडया-थोड्या अंतरावर बेकायदेशीररित्या विनापरवाना व्यवसायिक हेतूने एकूण ७ हजार ८७ किलो वजनाची अफूची झाडे लावली होती. ३ मार्च रोजी हा प्रकार उघडकीस आला. आज दुपारी सव्वाएक वाजता गुन्हा दाखल झाला अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने अधिक तपास करत आहेत.