कोरोनाविरोधात शैक्षणिक संस्थांचा एकत्रित लढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:18 AM2021-05-05T04:18:56+5:302021-05-05T04:18:56+5:30
पुणे : सध्याच्या कोरोनाकाळात आरोग्य क्षेत्रात माहिती संकलन, विश्लेषण आणि संशोधन होण्याच्या दृष्टिकोनातून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून पुढाकार घेण्यात ...
पुणे : सध्याच्या कोरोनाकाळात आरोग्य क्षेत्रात माहिती संकलन, विश्लेषण आणि संशोधन होण्याच्या दृष्टिकोनातून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून पुढाकार घेण्यात आला आहे. तसेच कोरोना विरोधातील लढाई एकत्रितपणे लढण्यासाठी विद्यापीठाच्या प्रांगणात स्थापन केलेल्या पुणे नॉलेज क्लस्टर व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांच्यात मंगळवारी सामंजस्य करार करण्यात आला आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. नितीन करमळकर, प्र. कुलगुरू डॉ. एन. उमराणी, आयुकाचे संचालक सोमक रायचौधरी, पुणे नॉलेज क्लस्टरचे मुख्य संशोधक डॉ. अजित केंभवी, आयसरमधील डॉ. एल. एस. शशिधरा, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य विभागाच्या संचालिका डॉ. अपूर्वा पालकर, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, अधिष्ठाता डॉ. सचिन मुंबरे, डॉ. श्रीकांत देशमुख, डॉ. डी. जी. बागल, डॉ. राजश्री नाईक, डॉ. मयूर गिरी आदी या वेळी कराराच्या वेळी प्रत्यक्ष तसेच ऑनलाइन पद्धतीने उपस्थित होते.
डॉ. शशिधरा म्हणाले, करारामुळे या दोन्ही संस्थांमधील डॉक्टर, माहिती तज्ज्ञ, प्रशासनातील अधिकारी मिळून एकत्रित माहिती संकलन, विश्लेषण, संशोधन, सर्वेक्षण आदी बाबी करू शकतील. तसेच पुणे नॉलेज क्लस्टरच्या माध्यमातून केवळ पुणे नाही तर पुणे विभागात येणाऱ्या जिल्ह्यांतील अभ्यास करणे शक्य होईल. या माहिती संकलनातून अनेक विषयांवरील संशोधन अभ्यास हाती घेता येतील.
--
आयसर, पुणे नॉलेज क्लस्टर, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या संस्थांमधील आरोग्य संशोधनातील तज्ज्ञ या करारामुळे एकत्र येत आहेत. यांच्या एकत्रित प्रयत्नातून सार्वजनिक आरोग्य प्रणाली सुधारण्यास मदत होईल.
- डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ