पारदर्शकतेसाठी सामूहिकऐवजी व्यक्तिश: चाचणी
By admin | Published: April 21, 2017 05:54 AM2017-04-21T05:54:15+5:302017-04-21T05:54:15+5:30
शिकाऊ वाहन परवाना देण्यासाठी परीक्षार्थीची चाचणी घेतली जाते. ही चाचणी सध्या एकावेळी पंचवीस जणांची एकत्रितरीत्या हॉलमध्ये घेतली जाते.
शिकाऊ वाहन परवाना देण्यासाठी परीक्षार्थीची चाचणी घेतली जाते. ही चाचणी सध्या एकावेळी पंचवीस जणांची एकत्रितरीत्या हॉलमध्ये घेतली जाते. ती अधिक पारदर्शक होण्यासाठी पुढील काळात बदल करण्याचे नियोजन आहे. परीक्षार्थीला स्वतंत्र संगणकावर चाचणी घेण्याचे नियोजन आहे. सर्व परीक्षार्थींसाठी वेगवेगळे प्रश्न असतील. या परीक्षेसाठीची २५० प्रश्नांची प्रश्नावली संकेतस्थळावर टाकली जाणार आहे. या प्रश्नावलीचा अभ्यास केल्यास परीक्षार्थीला वाहतूक नियमांबाबत भरपूर ज्ञान प्राप्त होईल, हादेखील यामागचा उद्देश आहे. यासह परीक्षेत देखील अधिक पारदर्शकता येईल. शिवाय व्यक्तिश: परीक्षा होणार असल्याने पूर्ण तयारी करुनच यावे लागणार आहे.
विनापरवाना वाहन चालविणे कायद्याने गुन्हा आहे. अल्पवयीन मुलांनी विनापरवाना वाहन चालविल्यास पालकांना दंड होतो, दंड वसूल करुन कायदेशीर कारवाईही केली जाते. हा एक भाग झाला. मात्र, आयुष्यभराचा आधार असलेल्या मुलाच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास जबाबदार कोण? एखादी दुर्घटना घडल्यास पालकांना आयुष्यभर मनस्ताप सहन करावा लागतो. यासाठी पालकांनीच काळजी घेत परवाना मिळाल्याशिवाय पाल्याला वाहन चालविण्यास देणे टाळावे. बेदरकारपणे वाहन चालविल्याने आपल्यासह इतरांनाही धोका निर्माण होतो, याचा गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे.
आॅनलाइन प्रक्रियेमुळे वाहन परवान्यासाठी अपॉर्इंटमेंट घेणे अधिक सोयीचे झाले आहे. ठरावीक दिवशी ठरावीक वेळेत संबंधित व्यक्ती कार्यालयात हजर राहू शकते. त्यामुळे व्यक्तीचा वेळ वाचतो.
मोशी येथील नवीन इमारतीत कार्यालय लवकरात लवकर स्थलांतरित करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. इमारत प्रशस्त असल्याने त्या ठिकाणी इतरही सोयीसुविधा उपलब्ध करुन देणे शक्य होईल. वाहन परवानाधारक असणारा चालक हा परिपूर्ण व प्रशिक्षित चालक असतो. रस्त्यावरून वाहन चालवीत असताना ही बाब स्वत:सह इतरांसाठी सुरक्षिततेची असते. त्यामुळे वाहतूक नियमांचे पालन करण्यासह वाहन परवाना घेणेदेखील महत्त्वाचे आहे. नवीन वाहन घेताना अगोदर वाहन परवाना असणे आवश्यक आहे. परवाना असल्यास वाहनचालकांना शास्त्रोक्त प्रशिक्षण दिल्यास अपघाताचे प्रमाण नियंत्रणात आणता येईल. यासाठी कासारवाडी येथे इन्स्टिट्यूट आॅफ ड्रायव्हिंग ट्रेनिंग अॅन्ड रिसर्च (आयडीटीआर) हे प्रशिक्षण केंद्र आणि चाचणी ट्रॅक सुरू करण्यात आला आहे.
या चाचणीत अनुत्तीर्ण होणाऱ्यांना पुन्हा आॅनलाइन अपॉर्इंटमेंट घेऊन चाचणीची संधी दिली जाते. ट्रॅकवर चालविण्यात येणाऱ्या वाहनाच्या हालचाली सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या साह्याने संगणकावर टिपल्या जातात. कंट्रोल रूममध्ये चाचणीच्या नोंदी घेऊन वाहनचालकाला किती गुण मिळाले, याचे प्रमाणपत्र दिले जाते.
या चाचणीच्या निकालाच्या आधारे आरटीओचे अधिकारी वाहन परवान्यासाठी संबंधितास पात्र ठरवतात. येथील चाचणी अधिक पारदर्शकपणे होत असल्याने वाहनचालकांनाही समाधान वाटते. यासह आत्मविश्वासही वाढतो.
वाहन चालविण्याचा परवाना मिळवायचा असेल, तर योग्य प्रकारे वाहन चालविण्याचे प्रशिक्षण घ्यावेच लागेल. वाहन चालविण्याच्या चाचणीत यशस्वी ठरल्याशिवाय कोणालाही परवाना दिला जात नाही.