रेमडेसिविरसोबतच टॉसिलिझुमॅब इंजेक्शन्सचे जिल्हाधिकारी वाटप करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:11 AM2021-05-18T04:11:58+5:302021-05-18T04:11:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जिल्हा प्रशासनाकडून रेमडेसिविरचा तुटवडा झाल्याने कोविड रुग्णालयांना पुरवठा करण्यात येत आहे. तर आता ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्हा प्रशासनाकडून रेमडेसिविरचा तुटवडा झाल्याने कोविड रुग्णालयांना पुरवठा करण्यात येत आहे. तर आता कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी वापरण्यात येत असलेले टॉसिलिझुमॅब या इंजेक्शनची देखील मागणी वाढली आहे. टॉसिलिझुमॅब इंजेक्शनचे वाटपाची जबाबदारी जिल्हा प्रशासनाकडे आहे. सोमवारी (दि. १७) जिल्हा प्रशासनाकडे टॉसिलिझुमॅबच्या ९८० कुप्या उपलब्ध झाल्या आहे. जिल्ह्यातील १०८ रुग्णालयांना याचे वाटप करण्यात आले.
टॉसिलिझुमॅब हे इंजेक्शनचे उत्पादन भारतात होत नाही, ते आयात केले जाते. आयातीनंतर केंद्राने ठरवून दिलेल्या कोट्यानुसार राज्यांना वितरीत केले जात आहे. अन्न व औषध प्रशासन व जिल्हा प्रशासन हे उपलब्ध झालेल्या या इंजेक्शनच्या कुप्या पुण्यातील रुग्णालयांना वितरकांमार्फत रुग्णालयांना वितरीत केले जात आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरोग्य यंत्रणेचे प्राधिकृत आरोग्य अधिकारी यांनी सदर वितरण तक्त्यानुसार वाटप होत असलेली आणि वितरीत औषधांचा योग्य वापर होत असल्याचे वेळोवेळी खातरजमा करुन अनियमितता आढळल्यास संबंधितांवर कारवाई करावी, अशा सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.