महाविद्यालय, बसस्थानक परिसरात छेडछाड!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 03:07 AM2018-08-23T03:07:26+5:302018-08-23T03:07:53+5:30
सुरक्षेसाठी समाजाचा पुढाकार आवश्यक; मोकाट रोडरोमिआेंवर पोलीस कारवाईची गरज
बारामती : शहर परीसरात मुलींच्या छेडछाडीचे प्रमाण वाढले आहे. पुणे शहरापाठोपाठ बारामतीची ओळख मोठे ‘एज्यूकेशन हब’ अशी आहे. त्यामुळे आसपासच्या चार ते पाच तालुक्यांमधुन मुले मुली शिक्षणासाठी शहरात येतात. सुमारे २५ ते ३० हजार विद्यार्थी, विद्यार्थिनी शिक्षणासाठी येतात. महाविद्यालय, बसस्थानक परीसरातच मुलींना छेडछाडीच्या प्रकारांना सामोरे जावे लागते.
टवाळखोरांमध्ये महाविद्यालयात प्रवेश नसलेल्या युवकांचा समावेश आहे हे विशेष. शिक्षण नसताना बिनधास्तपणे हि मुले सर्वत्र वावरतात. महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर ओळखपत्राची सक्ती करण्याची गरज असताना महाविद्यालय प्रशासन मात्र या बाबीकडे कानाडोळा करतात. आवड असणाऱ्या मुलींचा पाठलाग करुन त्यांची नावाची माहिती मिळवण्यापासून ही मुले सुरवात करतात. त्यानंतर सोशल मिडीयावर संबंधित मुलीला संंपर्क साधण्याचा प्रयत्न सुरु होतो. त्यासाठी ‘फे्रंडशिप ’ पाठविली जाते. प्रतिसाद मिळाला तर ठीक, अन्यथा तो मिळेपर्यंत मुलींचा पाठलाग सुरुच राहतो. दुर्लक्ष केल्यास मुलींचा रस्त्यात पाठलाग करणे, टोमणे मारण्याचे प्रक़ार केले जातात. अनेकदा मुली घरी महाविद्यालय शिक्षण बंद होण्याच्या भीतीने, विवाह उरकुन देण्याच्या भीतीने हे प्रकार सांगणे टाळतात. त्यामुळे या रोडरोमिआेंचे चांगलेच फावते.
दुचाकी, बुलेटवर तिघेजण मिळुन पाठलाग करतात. लांबुन हाका मारणे, मैत्रीचा प्रस्ताव पाठविण्याचे प्रकार सर्रास घडतात. असे प्रकार खासगी क्लास, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, विविध अॅकॅडमीच्या आवारात देखील टवाळखोरांच्या फेºया वाढल्या आहेत.
दिखाऊ व्यक्तिमत्वाकडे आकर्षित होउन फसणाºया मुलींची संख्या सुध्दा वाढत आहे. चहा, कॉफी घेतानाचा, गप्पा मारताना मोबाईलवर व्हीडीओ काढून तो व्हायरल करण्याची धमकी देण्याचे प्रकार देखील घडले आहेत. मुलींची आर्थिक लुट केली जाते. बेअब्रु होण्याच्या भीतीपोटी हे प्रकार पुढे आणले जात नाहीत. तर काही मुलीच मैत्रीणीचे सुत जुळविण्यासाठी पुढाकार घेतात.
गर्दीच्या ठिकाणी मुलींना धक्का मारणे, नकोसा स्पर्श करणारेही आहेत. मुलींची छेडछाड रोखण्यासाठी ग्रामीण पोलिसांचे निर्भया पथक, दामिनी पथक कार्यरत आहे. मात्र, निर्भया पथकाचे मोबाईल क्रमांक, माहिती घरोघरी पोचणे गरजेचे आहे. त्यासाठी स्थानिक ग्रामस्थ, ग्रामपंचायत प्रशासनासह पोलीसांच्या सहभागातून समुपदेशन कार्यशाळांची गरज आहे.
...त्यासाठी केले जाते मुलांबरोबर मैत्रीचे नाटक
शाळा, महाविद्यालयाबाहेर वावरणाºया मुलांचा शिक्षणाचा काडीमात्र संबंध नसतो. केवळ मुलींना छेडण्यासाठीच ही मुले या ठिकाणी येतात. त्यासाठी शाळा, महाविद्यालयातील मुलांशी मैत्री करण्याचे नाटक रोडरोमिओ करतात. त्यासाठी या मुलांना महागडी गिफ्ट, पार्टीचे आमिष दाखविले जाते. मुलींशी संपर्क येण्यासाठीच या मुलांबरोबर मैत्रीचे नाटक केले जाते.
...महिला पोलिसांनाच व्हावे लागते फिर्यादी
महाविद्यालय व इतर परिसरात मुलींची छेडछाड होत असते. मात्र, हे प्रकार घडताना तक्रार देण्यासाठी मुली पुढे येत नाहीत. अशा वेळी पीडित मुलीं व पालकांचे नाव कोठेही येऊ नये याची भीती बाळगतात. यासाठी महिला पोलीसांनाच फिर्यादी होऊन कारवाई करावी लागत आहे. छेडछाड होताच मुलींनी न घाबरता पोलीसांकडे तक्रार देणे गरजेचे आहे.
मुलींनी व्यक्त होण्याची गरज : अमृता भोईटे
समाजातील सर्वच विकृत लोकांच्या मानसिकतेत आपण बदल घडवून आणू शकत नाही. यामुळे रोडरोमिओंच्या त्रासाला कंटाळून मुलींनी आत्महत्यासारच्या गंभीर स्वरूपाचे पुढचे पाऊल उचलु नये.तर रोडरोमिआेंना धडा शिकवावा. न घाबरतात परिस्थितीला सामोरे जाऊन प्रथम व्यक्त होणे गरजेचे आहे, असे आवाहन निर्भया पथकाच्या महिला पोलीस नाईक अमृता भोईटे यांनी केले आहे. रोडरोमीओ मागे फिरुन त्रास देत असल्यास वेळीच पोलिसांना कळवणे गरजेचे आहे. अधिक काळ मुलींनी त्रास सहन करत बसला तर नैराश्याची भावना निर्माण होते.