महाविद्यालय निवडणूक : विद्यार्थी निवडणुकांसाठी मतमोजणीची वेगळी पध्दत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2019 01:04 PM2019-07-19T13:04:04+5:302019-07-19T13:10:49+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह राज्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये चालू शैक्षणिक वर्षापासून निवडणुका घेतल्या जाणार आहेत.
पुणे: विद्यार्थी निवडणुक प्रक्रियेत मतपत्रिकेवर उमेदवारांचे प्रसंतीक्रम दिले जाणार आहेत.त्यामुळे या मतपत्रिकांची मतमोजणी वेगळ्या पध्दतीने होणार आहे.परिणामी निवडणुक लढविणाऱ्या विद्यार्थ्यांना निवडून येण्यासाठी सर्व प्रथम मतदानाची व मतमोजणीची प्रक्रिया कोणत्या पध्दतीने होणार हे समजावून घ्यावे लागेल.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह राज्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये चालू शैक्षणिक वर्षापासून निवडणुका घेतल्या जाणार आहेत. मात्र,लोकसभा,विधानसभा किंवा महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी उमेदवारांची नावे आणि त्यांचे चिन्ह दिले जाते.त्यानुसार विद्यार्थी निवडणुकांसाठी मतपत्रिका असणार नाहीत.तर मतपत्रिकेवर निवडणुक लढणाऱ्या विद्यार्थी उमेदवारांची नावे इंग्रजी वर्णमालेनुसार नमूद केली जातील.त्यानुसार महाविद्यालयातील विद्यार्थी मतदार मतपत्रिकेवर आपल्या पसंतीच्या उमेदवारासमोर १, २, ३..., असे पसंती क्रम देतील.विद्यापीठ विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकांसाठी प्रत्येक महाविद्यालयात मतदान केंद्र असेल.मतदान प्रक्रिया समाप्त झाल्यानंतर मोहरबंद मतपेट्या संबंधित अभिलेखासह विद्यापीठात नेण्यात येतील.
विद्यापीठ विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकांसाठी मतमोजणी मतदानाच्या तिसऱ्या दिवशी सुरू केली जाईल.तसेच मतमोजणीच्या सलग प्रक्रियेनंतर निकाल घोषित केला जाईल. निवडणुक अधिकारी किंवा त्यांनी नियुक्त केलेली कोणतीही व्यक्ती मतपत्रिकांची छाननी करतील. तसेच मतपत्रिकांची मोजणी केल्यानंतर मतपत्रिकांची तपासणी करतील. प्रत्येक उमेदवारासाठी नोंदविलेल्या पहिल्या पसंतीक्रमानुसार आणि अवैध ठरलेल्या मतपत्रिका नाकारून गठ्ठ्यामध्ये त्याची विभागणी करतील. त्याचप्रमाणे निवडणूक अधिकारी उमेदवारांसाठी प्रथम पसंतीक्रम नोंदविलेल्या वैध मतांच्या संख्येइतकी मते प्रत्येक मतदारास देईल. निवडणुक अधिकारी वैध मतपत्रिकांच्या एकूण संख्येसंबंधी माहिती संकलीत करतील आणि आवश्यक मते (कोटा) निश्चित करतील.
मतमोजणीच्या वेळी केवळ उमेदवार किंवा त्याने सुचविलेला व्यक्तीच मतमोजणीच्या ठिकाणी उपस्थित राहू शकेल. मतमोजणीच्या कोणत्याही फेरी अखेर ज्या उमेदवाराकडे मतांची संख्या ही,आवश्यक मतांइतकी (कोटा) किंवा त्यापेक्षा जास्त असेल, त्या उमेदवारास विषयी घोषीत केली जाईल. एकापेक्षा उमेदवारांना अधिकची मते मिळालेली असतील तर ज्याला जास्त अधिकची मते मिळाली असतील त्याचा पहिल्यांदा विचार केला जाईल,त्यामुळे विद्यार्थ्यांना अशा लहान-मोठ्या नियमांचा सखोलपणे अभ्यास करावा लागेल.त्याशिवाय मतमोजणी योग्य पध्दतीने सुरू आहे किंवा नाही? हे समजू शकणार नाही.
---
महाविद्यालयीन निवडणुकांची मतमोजणीची प्रक्रिया त्याचप्रमाणे विद्यापीठ विद्यार्थी परिषदेच्या मतमोजणीची प्रक्रिया समजावून घेतल्या शिवाय विद्यार्थ्यांना निवडणुकीत विजयी होता येणार नाही.तसेच प्रचार करताना मतदारांनी कोणत्या पध्दतीने मतदान करावे,हे समजावून सांगावे लागणार आहे.परिणामी विद्यार्थ्यांना मतदानाच्या व मतमोजणीच्या पध्दतीचा अभ्यास करावा लागणार आहे.