जानेवारीत उघडणार महाविद्यालयांचे प्रवेशद्वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:28 AM2020-12-16T04:28:20+5:302020-12-16T04:28:20+5:30
पुणे: आम्ही शहरातील हॉटेलमध्ये मित्रांना भेटातो, बाजारात खरेदीला गर्दी करतो, एवढेच नाही तर पर्यटन स्थळांनाही भेटी देतो. कुठेही जाण्यास ...
पुणे: आम्ही शहरातील हॉटेलमध्ये मित्रांना भेटातो, बाजारात खरेदीला गर्दी करतो, एवढेच नाही तर पर्यटन स्थळांनाही भेटी देतो. कुठेही जाण्यास आम्हाला बंदी नाही ; मग कॉलेजमध्ये जाण्यावरच बंदी का? आता बस... आम्हाला आॅनलाईन शिक्षणाचाही कंटाळा आलायं...कॉलेज उघडा आम्हाला वर्गात बसून शिक्षण घेऊ द्या,अशा प्रतिक्रिया आता माहविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून व्यक्त केल्या जात आहेत. त्याचप्रमाणे विद्यापीठानेही जानेवारीत महाविद्यालय सुरू करण्याच्या दृष्टीने तयारीला लागले आहे.
कोरोनामुळे तब्बल आठ महिन्यांपासून घराबाहेर न पडलेली तरूणाई कोरोनाच्या रुग्णांची संख्या घटल्याने बाहेर पडत आहे. शहरातील रस्त्यांवर, हॉटेलमध्ये, एवढेच नाही तर विद्यार्थी आता महाविद्यालयाच्या आवरात मित्रांना भेटून गप्पा मारताना दिसत आहे. त्यातच राज्य शासनाने इयत्ता नववी ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिल्यामुळे पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागासह राज्यात अनेक ठिकाणी शाळा सुरू झाल्या आहेत.शालेय विद्यार्थी शाळेत जातात मग आम्ही का नाही? असा प्रश्न आता विद्यार्थी शिक्षकांना विचारू लागले आहेत.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने डिसेंबर महिना अखेरीस संलग्न माहाविद्यालये सुरू करण्याची तयारी केली होती. परंतु, कोरोनाची दुसरी लाट येण्याची भिती व्यक्त झाल्याने महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय स्थगित करण्यात आला. प्राचार्य व प्राध्यापक संघटनेनी महाविद्यालय सुरू करण्यास विरोध दर्शविला होता. परंतु, जानेवारी महिन्यात पुणे,अहमदनगर व नाशिक या तीनही जिल्ह्यातील महाविद्यालये सुरू करण्याचा विद्यापीठाचा मानस आहे.
------------------------------------
कोरोनाबाबत आवश्यक काळजी राज्यातील शाळा सुरू करण्यात आल्या आहेत.आवश्यक खबरदारी घेऊन जानेवारी महिन्यात तीनही जिल्ह्यातील संलग्न महाविद्यालये सुरू करण्याचा विद्यापीठाचा मानस आहे.परंतु, पालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करूनच महाविद्यालये सुरू केली जातील.
डॉ. नितीन करमळकर , कुलगुरू , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,
-----------------------------
शाळा सुरू होत असतील तर महाविद्यालये सुरू करण्यास कोणतीही हरकत नाही. अनेक विद्यार्थी आरोग्याची काळजी घेवून पालकांच्या संमतीने घराबाहेर पडत आहेत. त्यातच बरेच विद्यार्थी आॅनलाईन शिक्षणाला कंटाळले आहेत.त्यामुळे आता महाविद्यालये सुरू करावीत.
- अजय उमरगे, विद्यार्थी