पौड रस्त्यावर पीएमपीच्या धडकेत महाविद्यालयीन तरुणीचा मृत्यू; दुचाकीस्वार तरुण जखमी
By नितीश गोवंडे | Published: March 17, 2024 05:29 PM2024-03-17T17:29:48+5:302024-03-17T17:30:54+5:30
दुचाकी घसरल्यावर पीएमपी बसच्या चाकाखाली येऊन तरुणीचा मृत्यू
पुणे : पौड रस्त्यावर कचरा डेपो परिसरात पीएमपी बसच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघातात दुचाकीस्वार तरुण जखमी झाला असून, पीएमपी चालकाविरोधात कोथरूड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
माही मयूर गांधी (१९, रा. शोभा ऑप्टिमा बिल्डींग, माणिकबाग, सिंहगड रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे. अपघातात दुचाकीस्वार मंदार नानवटी जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी पीएमपी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस शिपाई अमोल नजन यांनी याबाबत कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार मंदार आणि त्याची मैत्रीण माही पौड रस्त्याने एमआयटी महाविद्यालयाकडे शनिवारी (ता. १६) सकाळी सातच्या सुमारास निघाले होते. कचरा डेपोसमोर भरधाव दुचाकी घसरली. त्यावेळी पाठीमागून आलेल्या भरधाव पीएमपी बसच्या चाकाखाली माही सापडली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या माहीचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. अपघाताची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप देशमाने यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या पीएमपी बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक बसवराज माळी करत आहेत.