खेड तालुक्यात महाविद्यालयीन तरुणीचा खून; दुसऱ्या दिवशी बहिणीचा साखरपुडा, कुटुंबावर दुःखाचा डोंगर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 20:57 IST2025-04-12T20:54:55+5:302025-04-12T20:57:00+5:30
दुसऱ्या दिवशी मोठ्या बहिणीचा साखरपुडयाचा असल्याने सर्व कुटुंब आनंदात होते, मात्र छोट्या मुलीचा खून झाल्यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला

खेड तालुक्यात महाविद्यालयीन तरुणीचा खून; दुसऱ्या दिवशी बहिणीचा साखरपुडा, कुटुंबावर दुःखाचा डोंगर
राजगुरुनगर: मांजरेवाडी धर्म ( ता खेड ) येथे महाविद्यालयीन तरुणीचा खून करून तिचा मृतदेह भीमा नदीच्या पात्रालगत मिळून आला आहे. आपेक्षा वसंत मांजरे (वय १७ रा. मांजरेवाडी धर्म, ता खेड ) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. या घटनेबाबत एका संशयित व्यक्तीला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
याबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडित तरुणी हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात शिक्षण घेत होती. दि. ११ रोजी राजगुरुनगर येथे नेहमीप्रमाणे सकाळी शिक्षणासाठी आली होती. ती दुपारी घरी न परतल्यामुळे घरातील लोकांनी मिसिंगची खेड पोलिसात तक्रार दिली होती. शनिवार दि १२ रोजी दुपारी भीमानदीकाठी तिचा मृत्यूदेह आढळून आला. सोबत असलेली बॅग बाजूच्या विहिरीत आढळून आली. पीडित तरुणीच्या डोक्यावर, चेहऱ्यावर गंभीर जखमा आढळून आल्या आहे. या घटनेबाबत गावातील एका संशयित तरुणाला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे असून तरुणीचा खून झाल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे सांगितले.
रविवार दि. १३ रोजी पिडित मुलीच्या मोठ्या बहिणीचा साखरपुडयाचा सोहळा होणार होता. त्यामुळे सर्व कुटुंब आनंदात होते. मात्र छोट्या मुलीचा खून झाल्यामुळे कुटुंबासह संपूर्ण गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.