कॉलेजने चुकवला बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:15 AM2021-08-22T04:15:00+5:302021-08-22T04:15:00+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इयत्ता बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांचा निकाल इयत्ता दहावी, अकरावी व बारावीच्या अंतर्गत ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इयत्ता बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांचा निकाल इयत्ता दहावी, अकरावी व बारावीच्या अंतर्गत गुणांच्या आधारे जाहीर करण्याचे निश्चित करण्यात आले. त्याचे सूत्र प्रसिध्द करण्यात आले. तसेच याबाबत सर्व कनिष्ठ महाविद्यालयांना आवश्यक सूचना देऊन ऑनलाईन पध्दतीने प्रशिक्षण देण्यात आले. त्यामुळे दिलेल्या संगणकीय प्रणालीत कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे अचूक गुण राज्य मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने पाठविणे अपेक्षित होते. मात्र, माऊंट कार्मेलमधील विद्यार्थ्यांचे चुकीचे गुण पाठवण्यात आले, असा आरोप पालकांनी केला आहे.
बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना अपेक्षेपेक्षा जास्त गुण मिळाले. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. परंतु, माऊंट कार्मेल शाळेतील मुलांना अपेक्षेपेक्षा फारच कमी गुण मिळाले. त्यांनी चौकशी केली असता शाळेकडून चुकीचे गुण दिल्याचे समोर आले. त्यावर विद्यार्थी व पालकांनी राज्य मंडळाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. मात्र, निकाल जाहीर होऊन १८ दिवस उलटून गेले तरीही या विद्यार्थ्यांच्या निकालात दुरूस्ती करण्याबाबत हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये संतापाची भावना आहे.
------------------------------------------------
कॉलेजने चुकीची माहिती पाठविल्यामुळे आमच्या मुलांना बारावीत कमी गुण मिळाले आहेत. राज्य मंडळाने कॉलेजकडून योग्य गुण मागवून विद्यार्थ्यांच्या निकालात दुरुस्ती करावी; या मागणीसाठी आम्ही राज्य मंडळाकडे पाठपुरावा करत आहोत.
- भाविका राका, पालक
फोटो - बारावी निकाल