‘यंगवन्स’ मल्लखांबपटूंना महाविद्यालयीन संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:12 AM2021-09-23T04:12:09+5:302021-09-23T04:12:09+5:30
शक्यतो या स्पर्धा पोल मल्लखांब (लाकडी) असतात. यामुळे युवा वाढत्या वयातही लाकडी मल्लखांबावरील कसबीतून सहजता, चापल्याने स्पर्धेत यश मिळवतात. ...
शक्यतो या स्पर्धा पोल मल्लखांब (लाकडी) असतात. यामुळे युवा वाढत्या वयातही लाकडी मल्लखांबावरील कसबीतून सहजता, चापल्याने स्पर्धेत यश मिळवतात. विविध आढ्या, झापा, सोमरसॉल्ट (हवेत झेपावून मारलेले कोलांटउडी), फिरक्या, ताकदीच्या प्रकारामधून सांघिक व वैयक्तिक विजेतेपद मिळवून महाविद्यालयाला यश प्राप्त करून देतात. आपण सध्या पुणे शहराचा याबाबत विचार केल्यास समाविष्ट महाविद्यालये व सहभागी मल्लखांबपटू (आंतरमहाविद्यालय स्पर्धा) यामध्ये प्रचंड तफावत असते. महाविद्यालयांची संख्या जास्त तसेच स्पर्धेतील मल्लखांबपटू कमी. परंतु, दर्जेदार असणार हे माझे या क्षेत्रातील अनुभवयुक्त मत आहे. पुण्यातील आंतर महाविद्यालयीन स्पर्धेतील मल्लखांबपटूंची संख्या वाढली व दर्जाही वाढल्यास भविष्यात ‘यंगवन्स मल्लखांबपटू’ तयार होतील.
खरेतर ‘यंगवन्स’ मल्लखांबपटूंना आंतरमहाविद्यालयातील व आंतरविद्यापीठ अशा स्पर्धा म्हणजे किशोरवयातील या क्षेत्रात योग्य दालन आहे.
आंतरविद्यापीठ मल्लखांब स्पर्धा या राष्ट्रीयस्तरावर असतात. पतियाळा येथील स्पर्धेत, तसेच आंतरविद्यापीठ स्पर्धा विविध राज्य व राज्येतर विद्यापीठे आयोजन करतात. या स्पर्धेतही आंतरविद्यापीठ स्पर्धांकरिता एखादे ‘आंतरविद्यापीठ मल्लखांब संघटना’ म्हणजेच (इंटरयुनिव्हर्सिटी मल्लखांब फेडरेशन) स्थापन करणे गरजेचे आहे. मल्लखांबपटू, प्रशिक्षक यांना आखीव व योग्य पद्धतीने पदके प्रशस्तिपत्रक व गुणांकन प्राप्त होईल. मल्लखांबसारखा क्रीडा प्रकारही पुणे विद्यापीठ तसेच इतर विद्यापीठांना गुणांकनाबरोबर मानांकन व यशस्वी मल्लखांबपटू प्रशिक्षक मिळवून देणारा खेळ ठरणार आहे. यात निश्चितच शंका नाही.
आंतरविद्यापीठ मल्लखांब स्पर्धा राष्ट्रीय स्तरावर असल्याने यांमधील फेडेरेशन स्थापन झाल्यास दर्जेदार विद्यापीठस्तरीय मल्लखांबपटू तयार होतील. भारतातील विविध विद्यापीठे या राष्ट्रीय स्तरावरील आंतरविद्यापीठ मल्लखांब स्पर्धा गाजवतील व स्तरही उंचावेल. खेळाडूंची संख्या व मल्लखांबपटू, सहभागी विद्यापीठे वाढल्यास महाराष्ट्रासह इतर राज्येही या खेळाकरीता किशोरवयीन ‘यंगवन्स’ मल्लखांब खेळाडू घडवतील यात शंकाच नाही. तसेच, त्यांनाही अनेक संधी उपलब्ध होतील.
केंद्र सरकारतर्फे ‘खेलो इंडिया’त यावर्षी पासून मल्लखांबसारखा क्रीडाप्रकार समाविष्ट झाल्याने मल्लखांबपटूंना राष्ट्रीय स्तरावर संधी होऊन पदकेही प्राप्त होतील. तसेच ‘इंटरयुनिव्हर्सिटी मल्लखांब फेडेरेशन’ स्थापन केल्यास मल्लखांबपटूंना राष्ट्रीय स्तरावरील गुणांकन व मानांकन वाढून अटीतटीतील मल्लखांब स्पर्धेत दिलखेचक व आकर्षक संच (सेट) सादर करता येतील. याकरीता महाराष्ट्रातील महाविद्यालये, विद्यापीठांबरोबर इतर राज्यातील महाविद्यालये व विद्यापीठ संलग्नता येऊन मल्लखांबपटू व प्रशिक्षक घडण्यात या खेळाला राष्ट्रीय स्तरावर पंचही मल्लखांबात कामगिरी उंचावतील.
थोडक्यात, ‘यंगवन्स’ मल्लखांबपटूंना आंतर महाविद्यालयीन व आंतरविद्यापीठ अशा जिल्हा व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा मिळून योग्य मार्गदर्शन, पदके व ‘क्रीडावृत्ती’ (शिष्यवृत्ती) प्राप्त होताना उत्तरोत्तर प्रगती प्राप्त व्हावी.
- श्रीनिवास हवालदार, राष्ट्रीय मल्लखांबपटू व प्रशिक्षक