दोन महिन्यांतरही महाविद्यालयीन सत्र सुरू होईना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:13 AM2021-09-07T04:13:04+5:302021-09-07T04:13:04+5:30
पुणे : कोरोनामुळे शैक्षणिक वर्ष विस्कळीत झाले असले तरी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आपल्या शैक्षणिक वर्षात कोणताही बदल केला ...
पुणे : कोरोनामुळे शैक्षणिक वर्ष विस्कळीत झाले असले तरी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आपल्या शैक्षणिक वर्षात कोणताही बदल केला नाही.परंतु,दोन महिन्यानंतरही विद्यापीठाचे सत्र नियमितपणे सुरू झाले नाही.तसेच विद्यार्थ्यांना कोणत्या पध्दतीने शिकवावे आणि त्यांच्या परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन पध्दतीने होणार याबाबत कोणतीही स्पष्टता नाही. त्यामुळे विद्यार्थी, प्राध्यापक व प्राचार्य यासर्वांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
कोरोनामुळे इयत्ता बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या.या परीक्षांचा निकाल जाहीर होण्यास ऑगस्ट महिना उजाडला. तसेच अद्याप अभियांत्रिकी, फार्मसी ,आर्किटेक्चरसह इतर व्यावसायीक अभ्यासक्रमाची सीईटी घेतली गली नाही. त्यामुळे या अभ्यासक्रमांचे वर्ग सुरू होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. मात्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने तत्पूर्वीच आपल्या शैक्षणिक वर्षातील पहिल्या व दुस-या सत्राच्या तारखा जाहीर केला. त्यानुसार कला, वाणिज्य व विज्ञान अभ्यासक्रमाचे सत्र १५ जूनपासून सुरू होणे अपक्षित होते. तर द्वितीय वर्षाचे प्रथम सत्र २० ऑगस्टपासून सुरू होणार होते. परंतु, विद्यापीठाने काही अभ्यासक्रमाचे निकाल अद्याप जाहीर केले नाही. त्यामुळे द्वितीय व तृतीय वर्षाचे वर्ग सुरू होऊ शकले नाहीत.
विद्यापीठाकडून विद्यापीठ अनुदान आयोगाकडून दिल्या जाणा-या सूचनांचे पालन केले जाते. परंतु, बदलत्या परिस्थितीनुसार शैक्षणिक सत्र सुरू करण्याबाबत विद्यापीठाने धोरणात्मक निर्णय घेणे अपेक्षित आहे. सप्टेंबर महिना उजाडला तरीही अद्याप पहिले सत्र सुरू झाले नाही. तसेच हे सत्र ऑनलाईन असेल की ऑफलाईन याबाबतही कोणती कल्पना नाही.विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाईन होणार असतील तर त्यांना ऑनलाईन परीक्षेच्या दृष्टीने शिक्षक मार्गदर्शन करू शकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सत्रासह परीक्षांबाबतही गोंधळाचे वातावरण असल्याचे दिसून येत आहे.
--------------------------------------------