कॉलेजला निघालेल्या विद्यार्थिनीला पाण्याच्या टँकरने चिरडले; नऱ्हे येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2021 12:06 PM2021-03-02T12:06:18+5:302021-03-02T12:09:39+5:30

तरुणीचा जागीच मृत्यू; टँकर चालकाला अटक 

A college student was crushed by a tanker; Incident at Narhe | कॉलेजला निघालेल्या विद्यार्थिनीला पाण्याच्या टँकरने चिरडले; नऱ्हे येथील घटना

कॉलेजला निघालेल्या विद्यार्थिनीला पाण्याच्या टँकरने चिरडले; नऱ्हे येथील घटना

googlenewsNext

धायरी : मैत्रिणी बरोबर दुचाकीवरून कॉलेजला निघालेल्या विद्यार्थिनीला पाण्याच्या टँकरने चिरडले. या झालेल्या अपघातात विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी नऱ्हे येथील अभिनव कॉलेज रस्त्यावर घडली. साक्षी आप्पा बाटे (वय१९, रा. बी, समर्थ नगर, गणेश नगर, धायरीपुणे) असे या अपघातात मृत्यु झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे.

याबाबत तिची मैत्रीण रागिणी बालाजी कंकुले (वय १९, किरकटवाडी, पुणे) यांनी टँकरचालकाविरोधात सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यावरून टँकर चालक सुदाम सोमा जाधव (वय:५० वर्षे, रा. धायरी, पुणे मूळ: यवतमाळ) यांस सिंहगड रस्ता पोलिसांनी अटक केली. 

सिंहगड रस्ता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साक्षी ही तिची मैत्रिण रागिणी बालाजी कंकुलेबरोबर दुचाकीवरून नऱ्हे येथील धायरेश्वर नर्सिंग कॉलेजला जात होती. अभिनव कॉलेज रस्त्याने जात असताना पाण्याचा टँकर( एमएच.१२,एचडी.४०९१) हा दुचाकीच्या पुढे चालला होता. टँकर चालकाने ब्रेक दाबल्याने दुचाकीवरील या दोघी जणी खाली पडल्या. दरम्यान दुचाकीवर पाठीमागे बसलेली साक्षी ही टँकरच्या मागे खाली पडली. त्याचवेळेस पुढे चढ असल्याने टँकर हा थोडा पाठीमागे आला, दरम्यान टँकरचे पाठीमागचे चाक साक्षीच्या डोक्यावरून गेले. यामुळे साक्षी ही या अपघातात जागीच ठार झाली.तर रागिणी कुंकुले किरकोळ जखमी झाली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत कणसे करीत आहेत.

.........
मनमिळाऊ साक्षी; धायरी परिसरात हळहळ व्यक्त
साक्षी हिचे वडील आप्पा बाटे यांचा धायरी येथील गणेशनगर परिसरात टेलरिंगचा व्यवसाय आहे. त्यांना एक मुलगा व मुलगी साक्षी असा परिवार होता. साक्षी ही नऱ्हे येथील धायरेश्र्वर नर्सिंग कॉलेजला शिकत होती. मात्र मनमिळावू असणाऱ्या साक्षीच्या जाण्याने त्यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच धायरी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.  
..... 

बेदरकारपणे वाहने चालवितात चालक ; कारवाई करण्याची मागणी
नऱ्हे - धायरी परिसरात सध्या उन्हाळ्यामुळे पाणीटंचाई जाणवत आहे. प्रत्येक सोसायटीला टँकर द्वारे पाणी पुरविले जाते. मात्र बऱ्याच वेळेला दिवसांत टँकरच्या जास्त खेपा व्हाव्या, म्हणून टँकर चालक बेदरकारपणे वाहन चालवितात. यातील बऱ्याच वाहनांचे फिटनेस सर्टिफिकेटही नसते. अशा वाहनांवर आरटीओने कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. 
 

Web Title: A college student was crushed by a tanker; Incident at Narhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.