महाविद्यालय आवारातील तंबाखूबंदी ‘पुडीत’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2015 06:54 AM2015-06-29T06:54:57+5:302015-06-29T06:54:57+5:30
‘लोकमत’ने केलेल्या पाहणीमध्ये अनेक शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्थांपासून १०० यार्डच्या परिसरातच तंबाखू, सिगारेटची विक्री केली जात असल्याचे दिसून आले आहे.
राहुल कलालल्ल पुणे
तरुण पिढी व्यसनांना बळी पडू नये म्हणून केंद्र सरकारने शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्थांमध्ये आणि त्यांच्या परिसराच्या १०० यार्ड परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनास व विक्री करण्यास बंदी घातली आहे. या बंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे काम शैक्षणिक संस्थांचे असतानाही ते केले जात नसल्याचे चित्र शहरात आहे. ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीमध्ये अनेक शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्थांपासून १०० यार्डच्या परिसरातच तंबाखू, सिगारेटची विक्री केली जात असल्याचे दिसून आले आहे.
तंबाखू, सिगारेट, गुटखा या व्यसनांची सर्वाधिक लागण ही तरुणांना होत असल्याचे दिसून आल्याने त्यावर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र शासनाने २००३ मध्ये सिगारेट व अन्य तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायदा देशात लागू केला. या कायद्यानुसार देशातील सर्व शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालये यांमध्ये तंबाखू, सिगारेट यांसह तंबाखूजन्य पदार्थ सेवनास आणि संस्थांच्या १०० यार्ड परिसरांमध्येही तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस बंदी घालण्यात आली आहे.
प्रत्यक्षात ही अंमलबजावणी करण्यातच येत नसल्याचे पाहणीत दिसून आले आहे. अनेक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये तर यासंदर्भातील फलकही नसल्याचे चित्र आहे. पुणे महापालिकेच्या अनेक शाळांमध्ये असे कोणतेही फलक लावण्यात आलेले नाहीत. विशेष म्हणजे, पालिकेच्या अनेक शाळांच्या आजूबाजूच्या १०० यार्ड परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री केली जात आहे.