नैराश्याचा आणखी एक बळी; कोथरुडमध्ये महाविद्यालयीन तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2020 13:11 IST2020-06-27T13:10:06+5:302020-06-27T13:11:31+5:30
नैराश्यातून आत्महत्या केल्याचा पोलिसांनी व्यक्त केला संशय

नैराश्याचा आणखी एक बळी; कोथरुडमध्ये महाविद्यालयीन तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
पुणे : कोथरुडमधील एका महाविद्यालयीन तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. नैराश्यातून त्याने आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
सूर्यकांत सुभाष बामणे (वय२४, रा. शिल्पा सोसायटी, एमआयटी महाविद्यालय रोड, कोथरुड) असे या तरुणाचे नाव आहे.
सूर्यकांत कला शाखेत शिक्षण घेत होता. सूर्यकांतचे वडील सातारा येथील एका आभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. त्याची आई शिक्षिका आहे.बामणे कुटुंबिय रहात असलेल्या इमारतीचा पुनर्विकास करण्यात येत असल्याने गेल्या काही दिवसांपासून ते शिल्पा सोसायटीत भाड्याने फ्लॅट घेऊन रहात आहेत. सूर्यकांतचे वडील शुक्रवारी सकाळी सातारा येथे जाण्यासाठी निघाले होते. त्यावेळी सूर्यकांत झोपेतून उठवला होता.वडील गेल्यानंतर तो पाणी पिऊन पुन्हा खोलीत झोपायला गेला. साडेआठ वाजण्याच्या सुमारास त्याची आई त्याला उठविण्यास गेली. परंतु, त्याने दरवाजा उघडला नाही़ तेव्हा आईने सूर्यकांतच्या मामाला याची माहिती दिली. मामानेही दरवाजा वाजविला. पण आतून प्रतिसाद न दिल्याने त्यांनी अखेर खोलीचा दरवाजा तोडला. त्यावेळी सूर्यकांत याने पंख्याला गळफास घेतल्याचे दिसून आले. आत्महत्या करण्यापूर्वी सूर्यकांत याने कोणतीही चिठ्ठी लिहिलेली आढळून आली नाही. त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. कोथरुड पोलिसांनी अकस्मात मृत्यु झाली नोंद केली आहे.