महाविद्यालये उद्योगांपासून दूरच
By admin | Published: May 12, 2014 03:13 AM2014-05-12T03:13:40+5:302014-05-12T03:13:40+5:30
पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या आठ महाविद्यालयांना ‘व्होकेशनल’मध्ये पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यास विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) नुकतीच मान्यता दिली.
पुणे : पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या आठ महाविद्यालयांना ‘व्होकेशनल’मध्ये पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यास विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) नुकतीच मान्यता दिली. मात्र, मान्यतेसाठी प्रस्ताव दिलेल्या अनेक महाविद्यालयांचा उद्योगक्षेत्राशी संबंध नसल्याने आयोगाने त्यांचे प्रस्ताव नाकारले. त्यामुळे महाविद्यालये व उद्योगांमध्ये अद्याप आवश्यक असलेले परस्पर सहकार्य नसल्याचे यावरून स्पष्ट होते. शैक्षणिक संस्था व उद्योगक्षेत्र एकत्रित आल्यास, मोठ्या प्रमाणात कुशल मनुष्यबळ निर्माण होऊ शकते. त्या अनुषंगाने ‘युजीसी’कडून देशातील विद्यापीठे, महाविद्यालयांना त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जातो. त्याचेच पुढचे पाऊल म्हणून ‘युजीसी’ने येत्या शैक्षणिक वर्षापासून ‘बी.व्होकेशनल’ हा पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी महाविद्यालयांकडून प्रस्ताव मागविले होते. संबंधित संस्थांचे उद्योगक्षेत्राशी परस्पर सहकार्य असणे आवश्यक आहे, अशी महत्त्वाची अट त्यासाठी होती. उद्योग क्षेत्राला बरोबर घेऊनच हा अभ्यासक्रम तयार करण्याची अटही ‘युजीसी’ने घातली आहे. त्यामध्ये बहुतेक महाविद्यालये नापास झाल्याचे चित्र आहे. वाढत्या स्पर्धेच्या युगात हे अंतर कमी होणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पुणे विद्यापीठाकडून सुमारे १५० महाविद्यालयांचे प्रस्ताव ‘युजीसी’कडे पाठविण्यात आले होते. मात्र, त्यापैकी केवळ ८ प्रस्तावांनाच मान्यता मिळाली आहे. राज्यातील एकूण २८ प्रस्ताव मान्य झाले असून, त्यात पुणे विद्यापीठ आघाडीवर आहे. याविषयी पुणे विद्यापीठाचे महाविद्यालये व विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक डॉ. व्ही. बी. गायकवाड म्हणाले, की देशात महाराष्ट्र यामध्ये आघाडीवर आहे. तर, राज्यात पुणे विद्यापीठाच्या सर्वाधिक प्रस्तावांना युजीसीने मान्यता दिली आहे. ज्या महाविद्यालयांचे प्रस्ताव अमान्य झाले, त्यातील बहुतेक महाविद्यालयांचे उद्योगांशी परस्पर सहकार्य नाही. या अभ्यासक्रमाला मान्यता देण्याबाबत ‘युजीसी’ची हीच मुख्य अट होती. तर, इतर कारणांमुळेही अन्य प्रस्ताव नाकारले. (प्रतिनिधी)