महाविद्यालये, विद्यार्थी संख्या दुप्पट; मनुष्यबळ ‘जैसे थे’च; साडेपाचशे पदे रिक्त
By प्रशांत बिडवे | Published: September 12, 2023 02:18 PM2023-09-12T14:18:12+5:302023-09-12T14:18:38+5:30
विद्यापीठाला कंत्राटीकरणाचे ग्रहण...
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांत एकीकडे माेठ्या संख्येने प्राध्यापकांची पदे रिक्त असतानाच आता अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तब्बल साडेपाचशे पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. विद्यापीठातील विभाग, संलग्न महाविद्यालये आणि विद्यार्थी संख्येत दुपटीने वाढ झालेली असतानाही अधिकारी आणि कर्मचारी संख्या मात्र अनेक वर्षांपासून ‘जैसे थे’ आहे.
शासनाने पुणे विद्यापीठात २००९ च्या आकृतिबंधानुसार १ हजार २५४ पदे मंजूर केली आहेत. मात्र, सध्या ७०५ अधिकारी आणि कर्मचारी आणि ६ संवैधानिक पदे असे ७११ पदे कार्यरत आहेत आणि ५४३ पदे रिक्त आहेत. गत १४ वर्षांत विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांची संख्या ४२६ वरून १ हजार ६६ एवढी, तर विद्यार्थी संख्येतही साडेचार लाखांवरून सुमारे साडेसात लाख एवढी वाढली आहे. काेविड प्रादुर्भाव कालावधीत परीक्षा विभागाच्या विस्कळीत कामकाजामुळे विद्यापीठ प्रशासनाला टीकेचे धनी व्हावे लागले हाेते. ट्रान्सस्क्रिप्ट वेळेवर न मिळणे, निकाल रखडल्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांना मानसिक त्रासाला सामाेरे जावे लागले हाेते. एकंदरीतच विविध विभागात पुरेसे मनुष्यबळ नसल्याने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे. तसेच सध्या कार्यरत मनुष्यबळाला आराेग्यविषयक समस्यांनी ग्रासल्याचे दिसून येत आहे.
पदनाम सुधारणा प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने सुधारित २०१८ मधील आकृतिबंध मंजुरीस अडथळा येत आहे. बालसंगाेपन रजा, आजारपण, निवडणूक कामे यासह विविध कारणांमुळे कर्मचारी रजेवर गेल्यास वेळेवर कामे हाेत नाहीत. अपुऱ्या संख्येमुळे मनुष्यबळावर कामाचा ताण वाढल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
विद्यापीठाला कंत्राटीकरणाचे ग्रहण
विद्यापीठातील तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची रिक्त पदे मागील काही वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने भरण्यात येत आहेत. त्यामुळे मनुष्यबळ पुरवणाऱ्या खासगी एजन्सीची चांदी हाेत आहे. मात्र, शासनाने पूर्णवेळ ही पदे भरावीत, अशी मागणी संघटनांकडून हाेत आहे. त्यात आता प्राध्यापकांची पदेही कंत्राटी पद्धतीने भरली जात असून त्यामुळे शिक्षणाचा दर्जाही ढासळत आहे.
प्लेसमेंट सेलमध्ये कर्मचाऱ्यांची वानवा
पुणे विद्यापीठाच्या विविध विभागांतून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना विविध नामांकित कंपन्यांकडून मागणी असते. विद्यापीठाच्या प्लेसमेंट सेलच्या माध्यमातून अनेकांना नाेकरीची संधी उपलब्ध करून देण्यात येते. मात्र, राेजगारासाठी अत्यंत महत्त्वाच्या प्लेसमेंट सेलमध्येच कर्मचारी नसल्याचे निदर्शनास आले हाेते.
पदे / अ / ब / क/ ड : एकूण संवैधानिक पदे
मंजूर पदे / ८७/ ९४/ ६६१/ ३९६ : १२३८ (१६)
कार्यरत पदे / ३१ / ३४ / ४६९/ १७१ : ७०५ (०६)
रिक्त पदे / ५६ / ६०/ १९२/ २२५ : ५३३ (१०)