महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना तीन दिवसांत मूळ कागदपत्रे द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:11 AM2021-05-09T04:11:49+5:302021-05-09T04:11:49+5:30
उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या कोणत्याही संस्थेत प्रवेश घेतल्यानंतर विद्यार्थ्यांची मूळ कागदपत्र जमा करून घेतली जातात. परंतु, विद्यार्थ्याने जमा केलेली ...
उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या कोणत्याही संस्थेत प्रवेश घेतल्यानंतर विद्यार्थ्यांची मूळ कागदपत्र जमा करून घेतली जातात. परंतु, विद्यार्थ्याने जमा केलेली प्रमाणपत्रे, पदविका अथवा पदवी व अन्य कागदपत्रे मागणी केल्यास ती ३ दिवसांच्या आता परत करण्याची कालमर्यादा निश्चित केली आहे. तसेच ३ जानेवारी २०१९ रोजी त्याबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आला आहे. मात्र, पूर्ण वर्षाचे शुल्क भरल्याशिवाय काही शैक्षणिक संस्थांकडून विद्यार्थ्यांना मूळ कागदपत्र दिली जात नाहीत. शैक्षणिक संस्थांकडून विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक होत असल्याच्या तक्रारी उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा ही बाब संस्थांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी तंत्रशिक्षण विभागाला नव्याने परिपत्रक काढण्याची वेळ आली आहे.
पुणे विभागीय तंत्रशिक्षण सहसंचालक डॉ. दत्तात्रय जाधव म्हणाले, सीईटी सेल प्रवेशाबाबतची अंतिम तारीख निश्चित केलेल्या तारखेपूर्वी विद्यार्थ्यांनी कागदपत्र मिळण्यासाठी अर्ज केल्यास त्यांना तीन दिवसांत मागणी केलेल्या विद्यार्थ्यांना कागदपत्रे देणे आवश्यक आहे. परंतु, ही कागदपत्रे देण्याबाबत विलंब केल्यास संबंधित संस्थेच्या प्राचार्यांना जबाबदार धरले जाणार आहे. पुणे विभागाकडे काही विद्यार्थ्यांचे याबाबत अर्ज प्राप्त झाले होते, परंतु संबंधित अर्ज सीईटी सेलने निश्चित केलेल्या प्रवेशाच्या तारखेनंतर विद्यार्थ्यांनी केलेले होते.