वापर न केलेल्या सुविधांचे शुल्क महाविद्यालयांनी परत करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:08 AM2021-06-17T04:08:55+5:302021-06-17T04:08:55+5:30
पुणे : कोरोनाकाळात राज्यातील सर्व महाविद्यालये बंद असून विद्यार्थी घरातूनच ऑनलाईन शिक्षण घेत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वापरल्या नाहीत अशा ...
पुणे : कोरोनाकाळात राज्यातील सर्व महाविद्यालये बंद असून विद्यार्थी घरातूनच ऑनलाईन शिक्षण घेत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वापरल्या नाहीत अशा प्रयोगशाळा, कॉम्प्युटर लॅब, स्टडी मटेरिअल, स्टेशनरी, इंटरनेट, फिल्डवर्क, एक्स्ट्राकरिक्युलर अॅक्टिव्हिटी, पार्किंग आदी सोई-सुविधांचे शुल्क महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना परत करावे, अशी मागणी युवक क्रांती दलाच्या वतीने बुधवारी पत्रकार परिषदेत करण्यात आली.
कोरोनाकाळात सर्वांच्याच आर्थिक परिस्थितीवर परिणाम झाला आहे. उद्योगधंदे व्यवसाय बंद पडल्यामुळे बऱ्याच पालकांचा रोजगार गेला. त्यामुळे महाविद्यालयांचे शुल्क भरणे विद्यार्थ्यांना अडचणीचे झाले. मात्र, काही महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांनी शुल्क भरले नाही म्हणून त्यांचे परीक्षा अर्ज नोंदवून विद्यापीठाकडे पाठविले जात नसल्याच्या तक्रारी येत आहेत. काही महाविद्यालये शुल्क भरण्यासाठी विद्यार्थ्यांवर दबाव टाकत आहेत.
महाविद्यालयांतर्फे विद्यार्थ्यांकडून वापरल्या जाणाऱ्या विविध सोई-सुविधांचे शुल्क जमा केले जाते. त्यामुळे राज्यातील काही महाविद्यालयांचे शुल्क लाखात आहे तर काहींचे हजारात आहे. परंतु, विद्यार्थ्यांनी वापरल्याच नाही, अशा सोई-सुविधांचे शुल्क संबंधित महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना परत केले पाहिजे. राज्यातील सुमारे पाच हजार विद्यार्थ्यांनी याबाबत युक्रांदकडे तक्रारी केल्या. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांनी या विषयाकडे गांभिर्याने लक्ष देऊन विद्यार्थ्यांना त्यांचे शुल्क परत देण्यासाठी धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी संघटनेचे राज्य कार्यवाह संदीप बर्वे यांनी केली. यावेळी राज्य संघटक जांबुवंत मनोहर, पुणे शहराध्यक्ष सचिन पांडुळे, जुबेर चकोली, प्रकाश गाडे उपस्थित होते.