कर्नल यांच्या पार्थिवावर अंत्यविधी, बेवारस असल्याने मृतदेह तीन दिवस ससून रुग्णालयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 01:23 AM2018-02-06T01:23:20+5:302018-02-06T01:23:24+5:30
भारतीय सैन्य दलात कर्नल म्हणून काम केलेल्या आणि उतारवयात कुटुंबीयांची साथ न मिळालेल्या रवींद्रकुमार बाली (वय ६४) यांना आयुष्याची संध्याकाळ कॅम्प परिसरातील एका पदपथावर घालवावी लागली.
येरवडा : भारतीय सैन्य दलात कर्नल म्हणून काम केलेल्या आणि उतारवयात कुटुंबीयांची साथ न मिळालेल्या रवींद्रकुमार बाली (वय ६४) यांना आयुष्याची संध्याकाळ कॅम्प परिसरातील एका पदपथावर घालवावी लागली. त्यांचा तीन दिवसांपूर्वी अज्ञातांनी खून केला होता. ते बेवारस असल्याने त्यांना मृतदेह तीन दिवस ससून रुग्णालयात ठेवण्यात आला होता. त्यानंतर पोलीसांनी वंदे मातरम् संघटनेच्या कार्यकर्त्यांसोबत बाली यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
बाली यांची तीन दिवसांपूर्वी अज्ञात मारेकºयांनी डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या केली होती. त्यांना कोणीही वारसदार नव्हते. त्यांचा मृत्यू झाल्यावर अंत्यविधी करण्यास कोणीही पुढे आले नाही. अखेर परिमंडळ-२ चे पोलीस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंडे यांच्या पुढाकाराने वंदे मातरम् संघटनेच्या पदाधिकाºयांसोबत येरवडा स्मशानभूमीत सोमवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास या सैन्य अधिकाºयाच्या पार्थिवावर अंत्यविधी करण्यात आले. या वेळी १९७० मध्ये बाली यांच्यासोबत पुण्यातील एन. डी. ए.मध्ये शिक्षण घेणारे त्यांचे तत्कालीन मित्र आणि आताचे सैन्य दलातील सेवानिवृत्त ज्येष्ठ अधिकारी उपस्थित होते. बाली यांची हृदय पिळवटून टाकणारी कहाणी त्यांच्या तोंडून उपस्थितांना ऐकायला मिळाली. वंदे मातरम् संघटनेचे महाराष्टÑ प्रदेशाध्यक्ष वैभव वाघ, कार्याध्यक्ष सचिन जामगे, प्रशांत नरवडे, विनोद मोहिते, किरण कांबळे, अमन अलकुटे, अमोल जगताप, आकाश गजमल, सूरज जाधव, किरण राऊत यांनी ससूनमधून बाली यांचा मृतदेह ताब्यात घेतला होता.
त्यानंतर स्मशानभूमीत त्यांचे पार्थिव नेण्यात आले. त्या वेळी जुलै १९७० ते जून १९७३ यादरम्यान बाली यांच्यासोबत ४४ व्या एन. डी. ए. बॅचमध्ये प्रशिक्षणार्थी असलेले आणि आता सैन्य दलातून निवृत्त झालेले लेफ्टनंट जनरल रवी दास्ताने, लेफ्टनंट जनरल अभिजित गुहा, ब्रिगेडियर बी. एल. पुनिया, कर्नल सुभाष पाटील, कर्नल अजॉय पोद्दार, कर्नल एस. पी. एस. चिक्कारा प्रामुख्याने अंत्यसंस्कारास उपस्थित होते.
>बडतर्फीनंतर फुटपाथवर आयुष्य
रवींद्रकुमार बाली ४४ व्या एन. डी. ए.च्या बॅचमध्ये १९७० ते १९७३ दरम्यान शिक्षणासाठी पुण्यात होते. त्यानंतर सैन्य दलात सुमारे २० वर्षे कर्नल म्हणून कामगिरी केली होती. सैन्य दलात बाली कार्यरत असताना त्यांच्या सावत्र भावंडांकडून त्यांच्या सख्ख्या आईचा छळ केला जात होता. त्यामुळे ते वारंवार घरी यायचे. त्यामुळे सैैन्य दलाची शिस्त मोडल्यामुळे त्यांना बडतर्फ करण्यात आले होते. तेव्हापासून बेवारस म्हणून पुणे शहरातील पुणे कॅन्टोन्मेंटमधील आॅफिसर मेसच्या समोरील फुटपाथवर त्यांनी अखेरचा काळ घालविला.
>रवींद्रकुमार बाली यांचा जन्म कोटा (राजस्थान) येथे झाला होता. त्यांचे वडील पोलीस खात्यात अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांच्या दुसºया बायकोपासून रवींद्रकुमार यांचा जन्म झाला. शालेय शिक्षणानंतर ते एनडीएमध्ये दाखल झाले.
>प्रशिक्षणानंतर फिरोजपूर जिल्ह्यातील हुसेनीवाला बॉर्डर म्युजियम येथे त्यांची पहिली नियुक्ती झाली होती. त्यांनी कौटुंबिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अविवाहित राहणेच पसंत केले.
>सैन्य दलातील नोकरी गेल्यानंतर २०१३ मध्ये त्यांनी केरळ सोडले. त्या पावसाळी दिवसात त्या रात्री त्यांनी एकट्याने घालविल्या. त्यांची सर्व महत्त्वाची कागदपत्रे पावसात भिजून खराब झाली होती. त्या वेळी शेवटच्या टप्प्यात त्यांनी सायकलवरून प्रवास केला. केरळ सोडल्यानंतर पुणे शहरातील कॅन्टोन्मेंट परिसरातील फुटपाथ हेच जणू त्यांचे घर बनले होते.